एमपीसी न्यूज – शेअर ट्रेडिंग करून जलद गतीने पैसे मिळवण्याच्या अमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या (Chinchwad) झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन दाखल होणाऱ्या अशा तक्रारींचा उंचावणारा आलेख चिंता वाढवणारा आहे. पार्ट टाईम जॉब व अधिकचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगत विविध प्रकारचे टास्क देत तरुणीची 1 कोटी 2 लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याची घटना 3 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत देहूरोड येथे घडली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोलिसांकडे आल्या आहेत. मागील सहा महिन्यात या घटना वाढल्या असून, आमिषाला बळी न पडता फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पहिल्या घटनेत एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Chinchwad) फिर्याद दिली. त्यानुसार व्हीआयपी सर्व्हिस 15 ग्रुप या नावाच्या व्हाॅटसअप ग्रुपची ॲडमीन मरीलेना या संशयित महिलेने अल्फा ॲक्सिस स्टाॅक क्लब या नावाचा ॲप डाउनलोड करण्यास सांगितला. त्या ॲपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेस शेअर खरेदी विक्री करण्यास सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीची 14 लाख 19 हजार 59 रुपयांची फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेत वाकड (Chinchwad) येथील एका 42 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनुराग ठाकूर, कौशल शर्मा या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी व्यक्तीस संशयितांनी शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर के. के. आर. सीए स्टडिंग ग्रुप एल-3 -व्हीआयपी 226 या स्टाॅक मार्केटिंग कंपनीमध्ये 25 लाख 30 हजार रुपये रक्कम गुंतविण्यास भाग पाडले. त्यातील एक लाख 15 हजार रुपये परत केले. त्यांचे 24 लाख 15 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.
स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून डॉक्टरची 29 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच थेरगाव येथे घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 20 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
स्टॉक मार्केट्स आणि ट्रेडिंग कशा पद्धतीने होते, याबद्दल सखोल माहिती घेतली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी मान्यताप्राप्त ब्रोकर्स, सल्लागार किंवा ऑनलाइन स्रोतांद्वारे दिली गेलेली कोणतीही माहिती दोनदा तपासली पाहिजे. उच्च परताव्याची हमी देणाऱ्या योजना या गुंतवणूकदारांना फसविण्यासाठी असतात. सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ डॅंडिया (एसइबीआय) या भारतीय नोंदणीकृत वेबसाइटवरून शेअर मार्केटबद्दल माहिती मिळते.
दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार तरुणी घरी असताना संशयित आरोपींनी त्यांना ऑनलाईन माध्यमातून संपर्क केला. त्यांना टेलिग्रामवरून पार्ट टाईम काम व अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रिपेड टास्कची माहिती दिली. त्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल असे अमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात 1 कोटी 2 लाख 83 हजार 848 रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत चोरट्यांचा मागोवा घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मान्यताप्राप्त कंपन्यांसोबत गुंतवणूक केली जाते. या कंपन्यांमध्ये एकच बँक खाते असते. त्याच अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करायचे असतात आणि त्यातून ट्रेडिंग केली जाते. मात्र, जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून काहीजण सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पेसे भरतात. फसवणूक झालेल्यांचे पेसे सायबर चोरटे पुढे वेगवेगळ्या बँक खात्यात वळवून घेतात. त्यामुळे ही साखळी शोधण्याचे पोलिसांना आव्हानात्मक ठरते. फसवणूक झाल्यावर तक्रारदार 2 ते 3 महिन्यांनी तक्रार देण्यासाठी येतात. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
चौकट
व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून आमिष
सायबर चोरटे टेलिग्राम, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफार्मवरून गुंतवणूक करण्याबाबतच्या पोस्ट शेअर करतात. तसेच व्हाट्सअपवरून ग्रुप तयार करून त्यामध्ये नवनवीन लोकांना सहभागी करून घेतले जाते. या ग्रुपमध्ये सायबर चोरट्यांचेच आठ ते दहा साथीदार ॲडमीन असतात. त्यांच्याकडून सातत्याने ग्रुपमध्ये बनावट पोस्ट शेअर केल्या जातात. आज मला खूप नफा झाला, अशा आशयाचा मजकूर सातत्याने ग्रुपमध्ये नमूद केला जातो. त्यामुळे ग्रुपमधील नवीन सदस्यांना देखील गुंतवणुकीसाठी आमिष दाखविले जाते.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे म्हणाले, “ऑनलाईन फसवणूक होणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. त्याच बरोबर गृहिणी आणि वृद्ध देखील ऑनलाईन ठगांना बळी पडत आहेत. आपण सोशल मीडिया वर काय सर्च करीत आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय मेसेज तसेच फोन येतात याचे भान नेटीझन्सने ठेवणे आवश्यक आहे. फसवणूक झाल्याचे समजायला उशीर होतो आणि मग त्याच्या तपासाला देखील विलंब होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असून, फसवणूक झाल्याचे समजताच तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा.”
आधी शिकवण्याचा बहाणा मग कोटींचा गंडा
– सोशल मीडियावर एखाद्या ग्रुपमध्ये किंवा पोस्टच्या माध्यमातून ओळख केली जाते.
– शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास शिकवण्याचा बहाणा केला जातो.
– गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे बनावट वेबसाइटव्दारे भासविले जाते.
– शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा आहे, असे आमिष दाखवून पैसे भरण्यास भाग पाडले जाते.
– फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत बराच कालावधी निघून गेलेला असतो.