एमपीसी न्यूज -संत निरंकारी मिशनच्या वतीने दिनांक 2 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी साडे सहा ते आठ पर्यंत स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या जागांमध्ये तसेच संत निरंकारी सत्संग भवन मध्ये(Yoga day) साजरा करण्यात आला.
पुणे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम आणि भोसरी सहित पुण्यातील मिशनच्या विविध सत्संग भवनांमध्ये 29 ठिकाणी योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते मिशनच्या भोसरी येथील सत्संग भवनमध्ये 250 हुन अधिक साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या मध्ये भोसरी परिसरातील जिजामाता शाळेतील 150 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग(Yoga day) घेतला होता. योग प्रशिक्षक श्री. अनंत सकपाळ यांनी योगांची विविध प्रात्यक्षिके करून घेतली.
योग ही भारताच्या प्राचीन परंपरेतील एक अमूल्य देणगी आहे. हे व्यायामाचे एक असे प्रभावशाली स्वरूप आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शारीरिक अवयवच नव्हे तर मन, बुद्धी, आत्म्याच्या दरम्यान संतुलन निर्माण केले जाते. त्यामुळेच योगाद्वारे शारीरिक व्याधिंच्या व्यतिरिक्त मानसिक समस्यांचेही निराकरण केले जाऊ शकते. निरंतर योगाभ्यासाने तल्लख बुद्धी, स्वस्थ हृदय, सकारात्मक भावनांची जागृती आणि शांतीसुखाने युक्त अशी जीवनशैली शक्य आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करुन आपण केवळ तणावमुक्तच राहू शकतो असे नव्हे तर एक आनंदी व सहजसुंदर जीवन जगण्याची कलाही आपल्याला प्राप्त होते. सध्याच्या धावपळीच्या युगात योगाची नितांत आवश्यकता आहे. जगातील जवळपास सर्व देशांकडून या योग संस्कृतीचा सहजपणे अंगीकार केला जात आहे.