एमपीसी न्यूज -वर्सोवा खाडीपाशी फाउंटन हॉटेलजवळ झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर राकेश यादव याच्या कुटुंबीयांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 50 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या(Thane) निवासस्थानी आमंत्रित करून हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव,मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव, वडील बालचंद्र यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टी कंपनीचे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम सुरू असताना 50-60 फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असताना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेला 25 दिवस उलटले तरी पोकलेन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार, एल अँड टी कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे एकूण 50 लाख रुपयांचा धनादेश आज दि.(21 जून) रोजी राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसहित मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 15 दिवसांहून अधिक प्रयत्न करूनही जेसीबी ऑपरेटर राकेश यादव याचा तपास होऊ शकला नाही. अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल,एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांना संयुक्तरीत्या काम करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर(Thane) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Manchar : आमदाराच्या पुतण्याच्या मोटारीची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी
तत्पूर्वी,राकेश यादव याच्या कुटुंबीयांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 50 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला असल्यामुळे यादव कुटुंबाची आर्थिक विवंचनेतून सुटका करण्यात आली असून भाऊ दुर्गेश यादव याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. पण तरीही सरकारी यंत्रणेला राकेश यादव यांचे मृतदेह बाहेर काढण्यास कधी यश येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.