एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Chinchwad)दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन गुरुवारी (दि. 27) परत आले. रुजू होताच त्यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी येथे भेट दिली. पालखी सोहळ्याच्या तयारीचा तसेच सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, (Chinchwad)पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सचिन हिरे, राजेंद्रसिंग गौर, देविदास गेवारे, प्रभारी अधिकारी उपस्थित होते
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे 13 जून रोजी सुट्टीवर गेले होते. दरम्यानच्या कालावधीत पोलीस आयुक्त पदाचा पदभार अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्याकडे देण्यात आला होता. दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन आयुक्तांनी गुरुवारी पुन्हा सूत्रे हाती घेतली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत देहू आणि आळंदी ही दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. दोन्ही तीर्थक्षेत्रांमधून आषाढी वारीसाठी पालख्या प्रस्थान करतात. देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी शुक्रवारी (दि. 28) प्रस्थान ठेवणार आहे. तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार वाडा येथे तर दुसरा मुक्काम आकुर्डी मधील विठ्ठल मंदिरात असतो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पालखी पिंपरी चिंचवड शहरातून पुणे शहराकडे मार्गस्थ होते.
आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शनिवारी (दि. 29) प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथे होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी दिघी गाव मार्गे पुण्याकडे प्रस्थान करते.
पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवरती असते. पालखी सोहळा सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला.
Hinjawadi : वाहनावर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त मंडळाचे माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे तसेच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, दिंडी मालक श्री आरफळकर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त तुकाराम महाराज मुळीक, संतोष महाराज सुंबे, आळंदी शहरातील दक्षता कमिटीचे डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, संजय घुंडरे पाटील आणि स्थानिक तसेच काही वारकऱ्यांशी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संवाद साधला. प्रस्थान सोहळ्यावेळी मंदिराच्या प्रांगणात परवानगी असलेल्या दिंड्यांची माहिती. तसेच त्या दिंड्यांचे आगमन आणि इतर बाबींची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.
त्यानंतर आयुक्तांनी देहूगाव येथे तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील सुरक्षेचा आढावा घेतला. देहूगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिकची खबरदारी घेण्यात आली आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात तैनात असलेल्या पोलिसांना आयुक्त चौबे यांनी सूचना दिल्या.