Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 6:51 pm

MPC news

Sant Tukaram Maharaj : देहूतून तुकोबा निघाले विठ्ठलाच्या दर्शनाला; तुकोबांच्या पालखीने प्रस्थान ठेवले

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj )यांचा 339 वा पालखी सोहळा यावर्षी होत आहे. टाळ-मृदंगाचा गजर, विणेचा झंकार, आणि जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने परिपूर्ण भरलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी (दि. 28) दुपारी दोन वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार साहेब वाड्यात असणार आहे.

शुक्रवारी पहाटे मुख्य मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा झाली. तपोनिधी नारायण महाराज समाधीपूजा झाली. तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. तिथून त्या मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या. सकाळी दहा ते बारा या कालावधीत पालखी सोहळा सप्ताहाचा काला झाल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.

संत तुकाराम महाराजांच्या या 339 व्या पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती. या सोहळयासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. मानाचा वारकरी आणि पाहुण्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून पादुका पालखीत विराजमान झाल्या.

पालखीने जसे प्रस्थान ठेवले तसे टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारक-यांचा उत्साह दुणावला. वारकरी विठ्ठलनामासोबत डोलू लागले, नाचू लागले. इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरात आपले सूर मिसळले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. काहींना तुकाबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोबाचरणी आपली सेवा रुजू केली. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर