एमपीसी न्यूज -भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या (Lonavala)धबधब्यातून एक महिला व चार मुले असे पाच पर्यटक रविवारी (30 जून) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहासोबत भुशी धरणात वाहून गेल्याची भीषण घटना घडली होती. पुण्यातील हडपसर येथील अन्सारी व खान परिवारातील 17 जण रविवारी लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते.
भुशी धरणाच्या मागील बाजूला एका धबधब्याच्या प्रवाहात ही मंडळी उभी असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने 9 जण पाण्यात वाहून गेले. यापैकी चार जण बाहेर निघाले तर नूर शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय 35), अमीमा अदील अन्सारी (वय 13) तिची बहीण हुमेदा अदील अन्सारी (वय 8), मारिया अकिल सय्यद (वय 9) व अदनान सबाहत अन्सारी (वय 4) हे पाच जण वाहून धरणात गेले.
Lonavala : भुशी धरण दुर्घटना; पाचवा मृतदेह मिळाला
यापैकी शाहिस्ता, अमीमा व हुमेदा यांचे मृतदेह रविवारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले होते. मारिया हीचा मृतदेह आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला तर अदनान या चार वर्षाच्या मुलाचा दिवसभर शोध घेतल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र व आयएनएस शिवाजी ही शोध पथके कालपासून धरणात शोध मोहीम राबवत होती.
शिवदुर्ग रेस्क्यू पथक दोन दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता उपाशी तापाशी भुशी धरणात ही शोध मोहीम राबवत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आयएनएस शिवाजी येथील रेस्क्यू पथक हे देखील मदतीसाठी आले होते.
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज सकाळी नऊ वाजता घटनास्थळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली होती. तसेच सर्व शासकीय यंत्रणा यांचे संयुक्त बैठक लावत पर्यटन स्थळी करावयाच्या सुरक्षा उपयोजना याबाबत सूचना दिल्या आहेत.