एमपीसी न्यूज – चिखली, हिंजवडी, एमआयडीसी भोसरी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वेगवेगळे अपघात झाले. या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुदळवाडी येथे अपघात झाला. मोहम्मद अफजल खान (वय 10, रा. मोरे-पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल कमाल अहमद मंजूर अली खान (वय 40) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14/एचयू 0823) या कारवरील चालक विक्रम दादाभाऊ कसबे (वय 41, रा. श्रीराम कॉलनी, चिखली) याला अटक केली आहे.
Hathras Stampede : धक्कादायक! देणगी आणि गर्दीचे ‘टार्गेट’ आणि 121 भाविकांचे बळी
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा दहा वर्षीय मुलगा मोहम्मद हा मोरे पाटील चौकात रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने मोहम्मद यास जोरदार धडक दिली. तसेच त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालेवाडी येथे अपघात झाला. सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सखाराम उतेकर यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्तीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Maharashtra : पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे फाटा येथे अपघात झाला. बाळासाहेब शिवराम भेगडे (वय 55, रा. विद्या सहकारी सोसायटी, परांजपे शाळेजवळ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या रिक्षातून सोनाली विकास पवार ही मुलगी चालली होती. रिक्षा सोमाटणे फाटा येथे आली असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने फिर्यादी यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनाली या किरकोळ जखमी झाल्या तर रिक्षा चालक बाळासाहेब भेगडे हे गंभीर जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोडाऊन चौक येथे अपघात झाला. कृष्णा लिंबाजी चराटे (वय 50) आणि कल्पना कृष्णा चराटे असे जखमी झालेल्या दांपत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा जावई रणजीत मार्तंड भालेराव (वय 35, रा. चर्होली गावठाण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इको गाडी (एमएच 14/एलपी 2408) वरील चालक गणेश सर्जेराव पोटे (वय 34, रा. अष्टविनायक नगरी, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे सासरे हे बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोडावून चौक, भोसरी येथे दुचाकीवरून येत होते. ते सिग्नल ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघाता त्यांचे सासरे कृष्णा चराटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर सासू कल्पना यांच्या हाताला दुखापत झाली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.