एमपीसी न्यूज – कार्ला-मळवली दरम्यानच्या पुलावरून एक व्यक्ती वाहून गेला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जुन्या पुलावरून केली जाते. मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने इंद्रायणी नदीचे पाणी वाढले आहे. जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे. शुक्रवारी सकाळी या पुलावरून जात असताना एक व्यक्ती वाहून गेला.त्यानंतर बचाव पथकांनी व्यक्तीला शोधण्याची मोहीम सुरू केली. मात्र इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. भुशी धरण परिसरात पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच मावळ तालुक्यात आणखी एक घटना घडली आहे.
CNG Bike Launching : जगातील पहिल्या CNG बाईकचे गडकरी यांच्या हस्ते लॉन्चिंग
दोन दिवसांपूर्वीच दिले होते तहसीलदारांना निवेदन
कार्ला-मळवली दरम्यान असलेला नदीवरील पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात उद्योग व्यवसायांसह पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पूल सुस्थितीत नसल्याने इथल्या आर्थिक बाबींवर मोठा परिणाम होत आहे. यामुळे भाजपचे रवींद्र भेगडे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी या पुलाचे काम तत्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती. ही मागणी करून दोन दिवसांचा कालावधी उलटतात एक व्यक्ती पुलावरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.