प्रांत अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा पॅटर्न बनविण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील 103 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात तसेच शहरांमध्ये व मोठ्या गावांमध्ये एकूण 24 ठिकाणी या योजनेची सुविधा केंद्रे सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक(MLA Sunil Shelke) करण्यात आली आहे. शेकडो कार्यकर्ते देखील या उपक्रमात सहभागी होऊन महिलांना आवश्यक ती मदत करणार आहेत, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.
महिलांना या योजनेच्या अर्जांचे वाटप करून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने प्रत्यक्षात अर्ज भरण्याची सुविधा सर्व महिलांना आपापल्या गावात व घराजवळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी झेरॉक्सपासून ते योजनेला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे महिलांना या केंद्रांवर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
आमदार शेळके म्हणाले की, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवीत आहे. आता महायुती सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. मावळातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. महिन्याला 1,500 रुपये मदत देण्याच्या या योजनेतून मावळातील एकही महिला लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी महायुती सरकारने सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तत्परतेने काम करण्याचे आदेश दिलेले आहेत.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचे काम महायुती सरकार करत आहे. या योजनेसाठी रेशनकार्ड आणि जन्माचा किंवा शाळेचा दाखला असेल तर उत्पन्न दाखला आणि अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाईल) आवश्यकता नाही. त्यामुळे महिलांना कागदपत्रे मिळविण्यासाठी कोठेही धावाधाव करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी(MLA Sunil Shelke) सांगितले.