Explore

Search
Close this search box.

Search

January 19, 2025 12:41 pm

MPC news

PCMC : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शिबिर; अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जलद गतीने होण्यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शिबिरांच्या आयोजनाचे योग्य नियोजन करून त्याअनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच जास्तीत जास्त पात्र महिलांनी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत  विहित मुदतीत अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील(PCMC)त्यांनी केले आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक(PCMC)घेण्यात आली.

या बैठकीस सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त अण्णा बोदडे, निलेश भदाणे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित,  अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे,  सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, तानाजी नरळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार यांच्यासह कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पात्र लाभार्थींना अर्ज भरणे तसेच स्विकृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सोमवार दि. 8 जुलै 2024 पासून  शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी  क्षेत्रीय कार्यालय निहाय काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी शिबिरासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करावी. या शिबिरासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, योग्य समन्वयासाठी आवश्यकतेनुसार समन्वयकांची नियुक्ती करावी, शिबिराच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दीचे योग्य नियोजन करून त्यानुषंगाने कार्यवाही करावी, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी यांनी कामकाज करावे, आदी सूचना प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना(PCMC)दिल्या.

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेस पात्र असणार आहे. पात्र लाभार्थींनी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत. या योजनेसाठी पात्र लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये पात्र लाभार्थीकडे  महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असावे.  किंवा 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

CNG Bike Launching : जगातील पहिल्या CNG बाईकचे गडकरी यांच्या हस्ते लॉन्चिंग

सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा 2.50 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य आहे. तसेच पिवळे आणि केसरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे, असे राज्य शासनाने निर्गमित  केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.  जास्तीत-जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.  दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या ठिकाणी जाऊन अर्ज भरून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर