एमपीसी न्यूज -पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि (Chakan )तळेगाव – चाकण- शिक्रापूर या मार्गावर शनिवारी ( दि. ६) पासून खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना व वाहन चालकांना करावा लागत आहे. अचानक वाढलेली रहदारी, आठवडे बाजार, बेशिस्त वाहन चालक, वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र चाकण मध्ये सकाळ पासून सायंकाळी उशिरा पर्यंत पहावयास मिळत होते. वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागल्याने पुणे -नाशिक महामार्ग व तळेगाव- चाकण ते शिक्रापूर महामार्ग आणि चाकण मधील अंतर्गत रस्ते अक्षरशः ‘ओव्हर फ्लो’ झाले होते.
चाकण मधील सर्वच महामार्ग , शहरातील अंतर्गत रस्ते , चौक व एमआयडीसीत जाणारे रस्ते येथे दिवसभर खूप मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दिवसभर ही वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ होती. चाकण वाहतूक शाखेने वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याने अक्षरशः सिग्नल बंद करून रात्री उशिरा पर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. अचानक पणे झालेल्या या प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला . चाकण मधील अंतर्गत रस्ते , पुणे नाशिक महामार्गावरील सेवा रस्तेही यामुळे ओव्हरफ्लो झाल्याची स्थिती पहावयास मिळत होती.
Hinjawadi : बहिणीला कामावर सोडण्यासाठी निघालेल्या भावाचा मृत्यू
चाकण वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले कि, शनिवार आठवडे बाजाराचा दिवस, वाढलेली रहदारी आणि महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी पडलेले खड्डे व साचणारे पाणी, रस्त्यात थांबणाऱ्या बसेस यामुळे प्रचंड कोंडी झाली होती. दिवसभर सिग्नल यंत्रणा बंद करून वाहतूक सुरळीत करण्यात येत होती.
...म्हणून प्रचंड वाहतूक कोंडी
चाकण मध्ये गुरांच्या बाजारात आणि शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते, त्यातच विकेंडमुळे नाशिककडे जाणार्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीला हातभार लागला. पावसाचे पाणी महामार्गावर अनेक ठिकाणी साचून राहत असल्याने रस्त्यावरील एकाच लेनने अनेक ठिकाणी वाहतूक सुरु होती. चौकांच्या ठिकाणी रस्त्याच्या लगत पाणी साचल्याने अनेक प्रवाशी रस्त्यावर वाहनांची वाट पाहत थांबल्याने, प्रवाशांना घेण्यासाठी आणि उतरवण्यासाठी वाहने रस्त्यावरच थांबत होती. मुख्य रस्त्यावरील रहदारी वाढल्या नंतर जागा मिळेल तसे वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न अनेक जण करत होते. शहरात सेवा रस्त्यावर दोन वाहने समोरासमोर आल्यानंतर होणारी कोंडी सुटता-सुटत नसल्याची स्थिती दिवसभर पहावयास मिळत होती. वाढलेली लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, अवजड वाहनांची आहोरात्र वाहतूक, अरूंद रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अपुरी सोय, प्रमुख मार्गावर अपुरी बसेसची संख्या, पोकळ घोषणांच्या पलीकडे न जाणारी महामार्गांची कामे आदी कारणांमुळे चाकण भागात वाहतूक व्यवस्थेचे ‘तीन तेरा वाजत ’ असल्याचा अनुभव पुन्हा एकदा नागरिक, प्रवाशी व वाहन चालकांनी घेतला.