अनुकूल हवामान आणि वेळेवर मान्सूनचा पाऊस यामुळे मावळ तालुक्यातील सोयाबीनचे पीक अतिशय चांगले आले असून दिवसेंदिवस सोयाबीन पिकाचे क्षेत्र मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात वाढत चालले आहे. मावळ तालुका हा भात पिकाचे अगर असल्याने या ठिकाणी भाताचे पीक सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जात असले तरी देखील मावळ तालुक्यातील काही ठिकाणी कमी पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणी खरीपाची पिके घेतली जातात. यामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्राधान्याने सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी पहिली पसंती दिलेली आहे.
मावळ तालुक्याच्या पूर्वपट्यातील इंदुरी, माळवाडी, तळेगाव,वडगाव, नवलाख उंब्रे, सोमाटणे फाटा, शिरगाव, धामणे, परंदवडी, गोडुंबरे साळुंब्रे,गहुंजे, सांगावडे, चांदखेड, आढले, पाचाणे पुसाणे या भागात पश्चिमपट्ट्यापेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे या भागात खरीप ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग, उडीद, वाटाणा, तुर यासारखी पिके घेतली जातात. त्यातही अलीकडच्या काळात सोयाबीनच्या पिकाकडे शेतकरी वळू लागला आहे. साधारणपणे मावळ तालुक्याच्या पूर्वपट्यातील 500 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी सोयाबीनचे पीक घेतले असल्याचे शासकीय यंत्रणेने जाहीर केलेले आहे.
मावळ तालुका कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आणि त्यांचे मंडल निरीक्षक सहाय्यक कृषी अधिकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे आणि लोकजागृतीमुळे या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या पिकाचे क्षेत्र वाढत चालले आहे हे पीक साधारणपणे 90 ते 100 दिवसांमध्ये येत असल्यामुळे आणि सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिक असूनही व्यापारी पीक म्हणून यापासून चांगली कमाई होत आहे. यावर्षी मावळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये अनुकूल वातावरण आणि योग्य पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची आपापल्या भागामध्ये पेरणी केलेली आहे असे कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय डुमणे यांनी सांगितले दरवर्षी या पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढू लागले आहे.