एमपीसी न्यूज – शहरात पावसाची सुरूवात होताच, पावसापासून संरक्षणासाठी छत्र्या, रेनकोटची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध आकाराच्या छत्र्यांसह रेनकोट पिंपरीतील मार्कटमध्ये उपल्बध असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र मे महिन्यांतील दर जूनच्या अखेरीस दुपटीने वाढले आहेत.
Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसची संख्या 11 वर
नागरिकांनी मुलांची पाठ्यपुस्तके, वह्या खरेदी करतानाच रेनकोटही खरेदी केले. मात्र काही नागरिकांनी पाऊस नसल्याने खरेदीकडे दुर्लक्ष केले. परंतु आधी मिळणारी 150 रुपयांची छत्री आता 220 रुपयांना मिळत आहे. तसेच रेनकोटची किंमत सुध्दा जवळपास दुप्पट झाली आहे. सध्या बाजारामध्ये तरुणींसाठी झालर छत्र्यांचा ट्रेंड आहे. आजोबांच्या काठीसारख्या छत्र्यांनादेखील मागणी आहे. तसेच पँट-शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्सपरंट अश्या प्रकारच्या रेनकोटला चांगलीच मागणी आहे. लहान मुलांचे रेनकोट 180 रुपयांना मिळत होते त्याचे दर आता 300 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. महिलांसाठी 350 ते 1500 रुपयांपर्यंत तर पुरुषांचे रेनकोट 500 ते 1500 रुपयांपर्यंत सामान्य रेनकोट आहेत. तर वेगवेगळ्या कंपन्यांचे फॅशनबेल रेनकोटही बाजारात दाखल झाले असून त्यांची किंमत दीड हजारांपासून तीन हजारांपर्यंत आहे.
वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. फॅशनेबल रेनकोटच्या मागणीतही वाढ झाल्याने यंदा रेनकोटच्या क्वालिटी आणि डिझाइनमध्ये मोठा फरक पहावयास मिळत आहे. यामुळे देखील उत्पादन खर्च वाढला आहे. पावसाळ्यात पूर्वी एकसारखे रेनकोट वापरले जायचे. सामान्यतः हे रेनकोट आकाराने मोठे असतात ज्यामुळे पाणी आत येत नाही. परंतु आता शरीराच्या फिटींगनुसार आकर्षक डिझाइनचे आणि जॅकेटप्रमाणे दिसणाऱ्या रेनकोटची मागणी वाढली आहे. यामुळे रेनकोट बनविण्यासाठी लागणाऱ्या मालातही बदल झाला आहे. याचा किंमतींवरही परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.