एमपीसी न्यूज – लग्नाला अवघे सात महिने झाले असतानाच सुखी संसारात संशयाची सुई (Shirur)आली. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला इलेक्ट्रिक शॉक तसेच गळफास देऊन तिचा खून केला. त्यानंतर पतीने याप्रकरणी पोलिसात फिर्याद देखील दिली. मात्र त्याचे ‘तो मी नव्हेच’ असा आव आणणारे नाटक पोलिसांसमोर फार काल टिकले नाही. पोलिसांनी धागेदोरे जोडून पतीला अटक केली.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव सांडस येथे 3 जुलै रोजी शीतल स्वप्नील रणपिसे (वय 23) या महिलेचा तिच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला. महिलेला इलेक्ट्रिक शॉक आणि गळफास दिल्याचे दिसून आले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आत्महत्या, खून अशा सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. त्यामध्ये शीतल यांचा पती स्वप्नील हा वारंवार वेगवेगळी हकीकत सांगत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे मान्य केले.
गतआयुष्यावरून पत्नीवर संशय
स्वप्नील याने विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवले होते. शीतल यांच्याशी लग्नापूर्वी त्याने अनेक मुली पाहिल्या होत्या. तो त्या मुलींना देखील गतआयुष्याबाबत विचारणा करत असे. त्याच्या संशयी स्वभामुळे अनेक मुलींनी त्याला नकार दिला होता. अखेर त्याचे शीतल यांच्याशी सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो तिला सतत गतआयुष्याबाबत विचारणा करत असे. त्यातून स्वप्नील हा शीतल यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यातून त्यांचे नेहमी भांडण होत होते. अखेर चारित्र्यावर संशय घेऊन त्याने पत्नीचा खून केला.
‘तो मी नव्हेच’चा बनाव
3 जुलै रोजी शीतल एकट्याच घरी होत्या. त्यावेळी अचानक येऊन स्वप्नील याने शीतलचा खून केला. त्यानंतर त्याने काही वेळाने घरी आल्याचे नाटक केले. शीतल बराच वेळपासून फोन उचलत नसल्याचे त्याने घरच्यांना सांगितले. त्यानंतर चुलत भावाला घेऊन घराच्या पाठीमागील दरवाजातून आत जाऊन पाहणी केली असता शीतल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर स्वप्नील याने स्वतः पोलिसात फिर्याद देखील दिली. मात्र त्याचा हा बनाव फार काळ चालला नाही.