एमपीसी न्यूज – दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर देशभक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या पॅराऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. अनंत अडचणींवर मात करत यशस्वीतेकडे उत्तुंग भरारी घेणारा हा बहुआयामी प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणा आणि दिशा देणारा आहे. तसेच ते या शहराचे नागरिक आहेत याचा सार्थ अभिमान शहरवासीयांना आहे, असे उद्गार आयुक्त शेखर सिंह(Pimpri) यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये शेखर सिंह यांच्या हस्ते पॅराऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी महापौर मंगला कदम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे(Pimpri) आदी उपस्थित होते.
नैराश्यातून बाहेर पडून नव्या उमेदीने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. त्यांचे हे कर्तृत्व, विविध खेळांमधील यशस्वी कामगिरी, देशप्रेम आणि संघर्षमयी जीवनप्रवास रेखाटणारा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पद्मश्री पेटकर यांनी प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्यातील विविध घटनांचा अंतर्भाव या चित्रपटामध्ये दर्शविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक असणाऱ्या या प्रतिभासंपन्न व्यक्तीच्या आयुष्याची कहाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चंदू चॅम्पियन हा चित्रपट महापालिकेच्या क्रीडाप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसह महापालिका शाळेतील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
Talegaon: तळेगाव-चाकण मार्गावर हिट अँड रन; महिलेला चिरडून वाहन चालक पसार
यावेळी पेटकर यांनी लष्करी सेवेत असतानाचे विविध प्रसंग, पॅराऑलिंपिकमध्ये भाग घेतल्यानंतर विविध खेळांमध्ये केलेली चमकदार कामगिरी तसेच व्यक्तीगत जीवनात घडलेल्या अनेक घटना सांगितल्या. श्रीनिवास पाटील महापालिका आयुक्त असताना महापालिकेने माझा सन्मान केला असल्याची आठवण देखील त्यांनी सांगितली. टेल्को कंपनी कॅन्टीन सुपरवायझर आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी जेआरडी टाटा यांनी दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्थायिक झालो. या शहराचा नागरिक असल्याचा अभिमान असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आजची मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांनी नैराशाच्या गर्तेत न जाता आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करावे. खेळाडूंनी जिद्दीने आपले कर्तृत्व सिद्ध करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केली.