एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या (Pimpri )रस्त्याच्या कामाची देयके काढून केलेल्या गैरव्यवहारातील दोषी ठेकेदारकडून वसुली केली जाईल. दोषी ठेकेदार, महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील जानेवारी 2022- 23 कोट्यावधी रुपयाच्या डांबरी व सिमेंट काँक्रीट करण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे 44 तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले होते. या रस्त्यांच्या कामाच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी करणेबाबत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्यामार्फत करून सदर कामातील दोषी ठेकेदार व निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करणारे संपूर्ण देयेके देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. लेखी उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत निविदा दराच्या 40% पेक्षा कमी दराने स्वीकृत करण्यात आलेल्या निविदांपैकी 15 रस्त्यांच्या कामांचे गुणवत्ता व दर्जा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे ह्या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येऊन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांनी दिलेले अहवालामध्ये काही रस्त्यांची गुणवत्तामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
या रस्त्यांची कामांची ठेकेदारांकडून दुरुस्ती व रक्कम वसूल करून याबाबत coep ने दिलेल्या अहवालातील शिफारशी नुसार निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची कामे केलेल्या दोषी ठेकेदारांकडून रकमेची वसुली व संबंधित रस्त्यांचे कामावर देखभाल करणाऱ्या महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासित केले.
महापालिकेतील रस्त्याच्या कामामध्ये मागील दोन-तीन वर्षापासून सातत्याने अधिकारी व ठेकेदाराच्या संगणमताने सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला सदर कार्यवाहीने लगाम लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिकेतील अधिकारी हे राजकीय दबाव झिडकारून करदात्या नागरिकांच्या पैशातून शहरात विकास कामे करताना महापालिकेचे हित जोपासण्याचे काम करतील अशी आशा व्यक्त करून आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या महापालिकेतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या केलेल्या कार्यावाहीवर समाधान व्यक्त केले.