एमपीसी न्यूज – भोसरी मधील सुवर्णा फायबर या कंपनीला बुधवारी (दि. 10) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन एलपीजी सिलेंडर आणि ज्वलनशील केमिकलचे 50 ड्रम तत्परतेने बाजूला काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत माहिती अशी की, डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयासमोर भोसरी येथे सुवर्णा फायबर या कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रासह चिखली, प्राधिकरण, तळवडे, मोशी, भोसरी उपकेंद्रातील एकूण नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले.
Maval : यांत्रिक पद्धतीने भात लागवडीस शुभारंभ
कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पत्रा शेडचे टेरेस आहे. तिथे ठेवलेल्या फायबर मटेरियल आणि मशिनरीला आग लागली होती. जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान कंपनीच्या किचन मधून दोन एलपीजी सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच फायबर प्लास्टिक मध्ये वापरण्यात येणारे ज्वलनशील केमिकलचे सुमारे 50 ड्रम तत्परतेने बाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रशिक्षणार्थी सब ऑफिसर सुनील फरांदे, लीडिंग फायरमन सारंग मंगरूळकर, शहाजी कोपनर, संपत गौड, संजय महाडिक, यंत्रचालक रुपेश जाधव, मयूर कुंभार, अमोल खंदारे, जालिंदर जाधव, वाहनचालक दत्तात्रय रोकडे, राजेश साखळे, शांताराम घारे, संभाजी सूर्यवंशी, फायरमन भूषण येवले, पुंडलिक भुत्तापली, अनिल माने, अवधूत आल्हाट, विकास भोंबाळे, नवनाथ शिंदे यांच्यासह 45 जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.