एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेन्ट ॲन हायस्कूलच्या श्रीरूप जगताप या विद्यार्थ्याने (Talegaon Dabhade)नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएससी आयसीएससी विभागात महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला. या यशामुळे त्याने मावळच्या शैक्षणिक नावलौकिकात भर टाकली आहे.
त्याला तळेगाव येथील उत्कर्ष प्रबोधिनीचे विपुलकुमार भुसारे यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेचा पाया समजली जाते. या परीक्षेतील प्रश्नांची रचना अतिशय क्लिष्ट व विचार करायला लावणारी असते. या परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. अभ्यासातील सातत्य, संयम व चिकाटी यामुळे हे सुयश प्राप्त झाले असे चि. श्रीरूप याने सांगितले.
श्रीरूप हा पुणे जिल्हा परिषदेने गौरवलेले माजी मुख्याध्यापक कै. जनार्दन माळी यांचा नातू असून कडधे शाळेतील आदर्श शिक्षिका प्रज्ञा माळी यांचा मुलगा आहे.
श्रीरुपच्या या कौतुकास्पद यशाबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अशोक शेलार, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहूमामा शेलार, युवा नेते साईनाथ शेलार, मा. उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, शिक्षक नेते राजू भेगडे, आदर्श शिक्षक विजय माळी, खजिनदार सुहास माळी, युवा नेते योगेश माळी यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन करत मावळच्या नावलौकिकात भर टाकल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अनेक मंडळींनी त्याचे कौतुक केले आहे.