एमपीसी न्यूज – लोणावळा (Lonavala) उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक दणकेबाज कारवाई केली आहे. कार्ला फाटा येथे आज (शुक्रवारी) पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत 48 किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा (Lonavala) भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. बातमीचे गांभीर्य ओळखून कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता.
मिळालेल्या बातमीप्रमाणे दि शुक्रवारी पहाटे 03.05 वाजताच्या सुमारास जुन्या मुंबई- पुणे हायवेवरील तेजस ढाब्याच्या समोर एक संशयित वाहन थांबल्याने कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इसमांचे सोबत असलेल्या चारचाकी वाहनाचे डिक्किमधील दोन पोत्यांमध्ये 9 लाख 20 हजार रुपये किमतीचा 48 किलो गांजा मिळाला.
MLC : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा 100 टक्के स्ट्राईक रेट , 9 पैकी 9 उमेदवार विजयी
सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. सदरच्या कारवाईमध्ये नितीन शिवाजी लेहने (वय 38, रा. औरंगपूर ता. शिरूर, जि. बीड), संदिपान पाटलोबा गुट्टे (वय 39, रा. परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड), गणेश सुरेश दराडे (वय 30, रा. केज, ता. केज, जि. बीड) यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
लोणावळा (Lonavala) ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणून पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा (Lonavala) उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, पो.नाईक दत्ता शिंदे, पो.कॉन्स्टेबल गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, महेश थोरात यांच्या पथकाने केली.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.
काय आहे संकल्प नशामुक्ती अभियान?
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा (Lonavala) विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.