एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुरंदावडे येथील पालखी रिंगण सोहळ्यात एक दुर्दैवी घटना घडली. अश्वांचे रिंगण सुरू असताना झालेल्या विचित्र अपघातात घोडा रिंगणालगत खाली बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला. त्यात एका छायाचित्रकाराचा दुर्दैवी अंत झाला.
कल्याण चटोपाध्याय (वय 48, रा. बारानगर, पश्चिम बंगाल) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या छायाचित्रकाराचे नाव आहे.
वारीचा उत्साह, भक्ती आणि जल्लोष आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक छायाचित्रकार पंढरीच्या वारीत सहभागी होतात. पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात अशाच एका फोटोग्रारचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
CM Eknath Shinde : अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र हेच माझं कुटुंब…
संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात दुपारी साडेतीनच्या सुमारास हे दुर्घटना घडली. अश्वांचे रिंगण सुरू असताना एका अश्वाच्या गळ्यातील पट्ट्यात पुढील अश्वाचा पाय अडकल्याने तो घोडा रिंगणालगत खाली बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला. यात वारकरी आणि भक्तांमध्ये बसलेले फोटोग्राफर चटोपाध्याय जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर येथे होत असते. हजारो भाविक हा रिंगण सोहळ्यासाठी जमतात. काही दिवसांपूर्वीच माऊलींच्या पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी पुरंदावडे गावच्या हद्दीतील रिंगण सोहळ्याचे मैदान मुरुम भरून मोठ्या रोलरने सपाट करण्यात आले होते.
आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला. मात्र, या रिंगण सोहळ्यात झालेल्या अश्वाच्या अपघातात छायाचित्रकाराला जीव गमवावा लागला. त्यामुळे या सुंदर सोहळ्याला गालबोट लागले.