तळेगाव शहरालगतच्या औद्योगिक वसाहतींमुळे शहरामधील देशी मद्य विक्री करणाऱ्या दुकानामध्ये सहजपणे अल्पदरात, देशी मद्य, प्लास्टिक ग्लास, पाण्याची बाटली व चने, वाटणे – फुटाणे मिळत असल्याने हे मद्यपी हे साहित्य घेऊन जवळपास उभे राहून मद्य पित असतात.
या मद्यपींना बारमध्ये बसून मद्य प्राशन करणे शक्य होत नाही मग हेच मद्यपी मद्य दुकानालगतच्या गल्लीमध्ये खाद्य टपरीच्या आडोशाला, स्वच्छ्तागृहामध्ये दारू पितात व रिकाम्या बाटल्या, ग्लास तिथेच टाकून निघून जातात. या सर्व प्रकारामुळे नगरपरिषदेच्या स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळीच अनेक ठिकाणी फुटलेल्या बाटल्यांच्या काचा, प्लास्टिकचे ग्लास गोळा करावे लागतात.
शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी राबत आहे.दारू पिणाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी तसेच स्वच्छ्तागृहामध्ये बाटली, ग्लास टाकू नये व स्वच्छतेचे भान ठेवावेत, पोलिसांनी दारू विक्रेत्यांना समज द्यावी,असे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक तुकाराम मोरमारे यांनी म्हटले आहे.
आमच्या घराला लागून भिंतीच्या खिडकीजवळ हे मद्यपी दारू पितात त्यामुळे आम्हांला खिडकी बंद ठेवावी लागते, बोळात दारूचा उग्रवास दरवळतो याचा आम्हांला नाहक त्रास सोसावा लागतो, असे स्थानिक महिलेने म्हटले आहे.