एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात एकीकडे रात्री गावोगावी बिबट्यांचा उच्छाद सुरु असताना आता अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. रात्रीच्या वेळी अनेक गावांमध्ये फिरणाऱ्या ड्रोनविषयी पोलिस व तालुका प्रशासनाकडून कुठलाही खुलासा केला जात नाही. पुण्यात मिळून आलेल्या काही असामाजिक प्रवृत्तीच्या मंडळींकडे ड्रोन आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या पाठोपाठ ड्रोनचे संकट आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
दरम्यान जलसंपदा विभागाने खेड पोलिसांना दिलेले पत्र नुकतेच सोशल माध्यमातून समोर आले आहे. सदरचे पत्र पोलीस निरीक्षक खेड, आंबेगाव व शिरूर यांच्या नावे आहे. चासकमान प्रकल्पच्या वितरण व्यवस्थेचे बंद नलिका वितरण प्रणालीसाठी चासकमान डावा कालवा या मधून शून्य ते शंभर किलोमीटर मधील वितरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व संकल्पन करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करता यावे या कामासाठी ड्रोन कॅमेरा वापर करता यावा यासाठी परवानगी मागणारे पत्र संबंधित विभागाने खेड, आंबेगाव व शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिल्याची बाब समोर आली आहे. निरनिरळ्या शासकीय कामांसाठी जमीन मोजणीसाठी दिवसा ड्रोन फिरवल्यास नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो; त्यामुळे रात्रीच्या वेळी असे ड्रोन फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान प्रशासनाकडून अजूनही या बाबत अधिकृतपणे काहीही सांगितले जात नसल्याने नागरिकांमधील संभ्रम कायम असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.