एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील शिरदे येथे बिबट्या आढळला. त्या बिबट्याला वनविभाग आणि रेस्क्यू टीमने जेरबंद केले. तसेच त्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे नेण्यात आले.
सोमवारी (दि. 15) सकाळी मावळ तालुक्यातील शिरता वन परिक्षेत्रातील शिरदे येथे एक बिबट्या आढळला. याबाबत वनविभागाला माहिती मिळाली असता वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम शिरदे गावात पोहोचली. बिबट्या एका गोठ्यामध्ये असल्याचे आढळले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
हा बिबट्या अस्वस्थ असल्याचे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याला पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे पाठविण्यात आले.
ही कामगिरी मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोता वनपरिक्षेत्राचे वनपरीक्षेत अधिकारी सुशील मंतावार, वनपाल मंजुषा घुगे, वनरक्षक गजेंद्र भोसले, युवराज साबळे, दीपक उबाळे, सुरेश ओव्हाळ, शंकर घुले यांनी पार पाडली.