एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भोसरीला दिशाहीन नेतृत्व मिळाले आहे. बकालपणा आला आहे. पैसे खर्च होत आहेत. पण, आउटपुट दिसत नाही. प्रत्येक निविदेत रिंग केली जाते. याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो. कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आमदारांचे काम करणार नाही हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडून गव्हाणे यांनी आज समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तत्पुर्वी पत्रकारांशी बोलताना गव्हाणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटलो होतो. यापुढे पवार साहेब पुढील जी दिशा देतील, त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. भोसरी विधानसभेतील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करत आहोत. त्यांच्याच आशिर्वादाने आम्ही काम करत आहोत. ते निश्चितपणे आमच्यासोबत आहेत. ही अचानक घडलेली घटना नाही. पक्ष फुटल्यानंतर कोणाकडे जावा असा प्रश्न निर्माण झाला होता. पवारसाहेब, अजितदादा दोघांवर आमचे तितकेच प्रेम आहे. पक्ष फुटीवर काही मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु, निघाला नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे. भोसरीला दिशाहीन नेतृत्व मिळाले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाला बकालपणा आला आहे. पैसे खर्च होत आहेत. पण, आउटपुट दिसत नाही. प्रत्येक निविदेत रिंग केली जाते. याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो. कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आमदारांचे काम करणार नाही हे अजित पवार यांना सांगितले होते. काल आणि यापूर्वीही अजित पवार यांची भेट घेतली होती. याबाबत चारवेळा आमची चर्चा झाली. आमची भूमिका दादांकडे मांडली आहे. आमची भूमिका दादांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे पुढची दिशा आमच्यासाठी सोपी आहे. विधानसभेला मी इच्छुक आहे. मागच्यावेळीच पक्षाने मला निवडणूक लढविण्यास सांगितले होते. परंतु, विलास लांडे इच्छुक होते. त्यामुळे मी थांबलो होतो. आता निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. भाजपचेही अनेक नगरसेवक नाराज आहेत. तेही येत्या काळात आमच्यासोबत येतील. विलास लांडे हे देखील आमच्यासोबत येतील.