एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर(Pune)येथील बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यांच्या संयुक्तविद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, बाणेर, येथे ७१ व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुरुष व महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी ‘सतेज करंडक’ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या पहिल्या झालेल्या उपात्य पुर्व फेरीच्या सामन्यात नंदुरबार संघाने कोल्हापूर संघावर ३१-२४ अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला नंदुरबार व कोल्हापूर ११-११ अशा समान गुणांवर होते. मध्यंतरानंतर नंदुरबारच्या वरुण खंडाळे यांने चौफेर आक्रमण करीत विजय मिळविला. त्याला दिपक शिंदे व जय महाजन यांनी पकडी घेत सुरेख साथ दिली. कोल्हापूरच्या ओंकार पाटील याने आक्रमक खेळ केला. तर दादासो पुजारी याने पकडी घेतल्या.
उपांत्य पुर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पुणे शहर संघाने तुल्यबळ पालघर संघावर ६०-४४ अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे३०-२१ अशी आघाडी होती. पुणे शहर संघाच्या तेजस पाटील, शुभम शेळके व सुनिल दुबिले यांनी चौफेर हल्ला करीत पालघरचा बचाव भेदत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर गुंडू मोरेय याने चांगल्या पकडी केल्या. पालघरच्या प्रतिक जाधव व राहुल सवर या खेळाडूंनी चांगला खेळ केला. तर प्रेम मंडल यांने पकडी घेतल्या.
उपांत्य पुर्व फेरीच्या अत्यंत अटितटीच्या तिसऱ्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पुर्व संघावर ३७- ३३ अशी मात केली. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघ ९-१८ असा पिछाडीवर होता. मात्र पुणे ग्रामीण संघाच्या अजित चौहान, तेजस काळभोर, अक्षय सुर्यवंशी यांनी मध्यंतरानंतर जबरदस्त आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर ऋषिकेश भोजने व तुषार अधावडे यांने सुरेख पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. हा सामना निर्धारित वेळेत २९-२९ अशा समान गुणांवर संपला. त्यामुळे हा सामना पाच- पाच चढायांवर खेळला गेला. पाच पाच चढायांमध्ये पुणे ग्रामीण संघाने ८ गुण मिळविले तर मुंबई उपनगर पुर्व संघाने ४ गुण मिळविले. त्यामुळे अंतिम गुण संख्या पुणे ग्रामीण ३७ व मुंबई उपनगर पुर्व संघाने ३३ गुण मिळविले. मुंबई उपनगर पूर्वचा संघ मध्यंतरापुर्वी आक्रमक खेळ करीत होता. तर त्यांनी बचाव देखील जोरदार केला होता. मात्र मद्यंतरानंतर त्यांचा बचाव ढेपाळला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई उपनगर पुर्वच्या आकाश रुडले याने अष्टपैलू खेळ केला. आर्यवर्धन नवले याने सुरेख चढाया केल्या. तर अरकम शेख, अक्षय बर्डे व अलंकार पाटील यांनी उत्कृष्ठ पकडी घेतल्या.