एमपीसी न्यूज – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप कार्यक्रम रात्री उशिरा पर्यंत संपन्न झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक नितिन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात झालेल्या बैठकीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत,आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे, संचालक नितीन गोरे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर आदी उपस्थित होते.
दरम्यान देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमली.