एमपीसी न्यूज – प्रशिक्षणार्थी भारतीय सनदी अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भात दररोज नवीन कारनामे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात संचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ठाकरे सरकारच्या काळात त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर सन 2023 मध्ये त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती.
सुरुवातीला पूजा खेडकर यांच्या खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणे, वाहनावर अंबर दिवा लावणे, कार्यालय, कर्मचारी यांची मागणी यामुळे चर्चेत आलेले प्रकरण वेगवेगळ्या वळणांवरून जात आहे. पूजा खेडकर यांची वाशिम येथे प्रशिक्षणासाठी बदली झाली. त्यानंतर लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने त्यांचे प्रशिक्षण स्थगित करून त्यांना तत्काळ मसुरी येथे 23 जुलै पूर्वी हजर राहण्याचे आदेश दिले.
Pune Accident : पुण्यात माजी उपमहापौरांच्या मुलाच्या एसयूव्हीची टेम्पोला धडक; तीन जखमी
तसेच पूजा खेडकर यांनी खोटा पट्टा आणि बनावट रेशन कार्ड देऊन अपंगत्व प्रमाणपत्र मिळवले. अपंगत्वाची टक्केवारी कमी असताना ती वाढवून घेतली.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या आईने पिस्तुलाचा धाक दाखवून मुळशी मधील शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर याबाबत पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेल मधून अटक करण्यात आली.
खेडकर कुटुंबियांचे कारनामे संपण्याचे नाव घेत नाहीत. दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत. आता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना शासनाने सक्तीची निवृत्ती दिल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असताना त्यांचे दोन वेळा निलंबन देखील झाले होते.
सन 2007 पासून ते तीन वर्ष कोल्हापूर येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते कोल्हापूर मधील लहान-मोठ्या कारखान्यांना भेट देत. कोणाला चिमणी लहान आहे मोठी कर, कोणाला स्कारबर वेगळा लाव असे सांगत. पुढे ते स्वतःच्या Thermovetara या कंपनीचे कार्ड देत व सांगत की, आठ दिवसात पर्चेस ऑर्डर काढून आगाऊ रक्कम पाठवा. अन्यथा क्लोजरची कारवाई करू. याच Thermovetara कंपनीमध्ये दिलीप खेडकर यांची पत्नी मनोरमा, मेहुणा आणि मुलगी पूजा हे संचालक आहेत.
दिलीप खेडकर यांनी सातारा आणि पुणे येथील उद्योजकांना देखील त्रास दिल्याचे आरोप आहेत. 2019 मध्ये सातारा येथील सोना अलॉयज प्रा. ली. कंपनीने 40 हजार रुपये जास्त लाच देण्यास नकार दिल्याने खेडकर यांनी त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. पुणे येथील सुप्रभा पॉलिमर आणि पेकेजिंग या फर्मने देखील खेडकर यांच्यावर 20 लाखांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
दिलीप खेडकर यांच्याबद्दल सतत तक्रारी येत असल्याने सन 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली. सक्तीच्या निवृत्ती नंतर दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार अर्ज प्राप्त झाला. एसीबीच्या नाशिक विभागाकडून दिलीप खेडकर यांच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेची चौकशी सुरु आहे.