एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी (दि.20) पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी चार वाजता विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार(Pimpri) विजयी होतील, असा विश्वास शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, विशाल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष धम्मराज साळवे हे देखील उपस्थित होते. त्यांनी एमआयएमच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पवार गटात प्रवेश केला आहे.
शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरात ज्येष्ठ नेते शरद पवार मेळाव्यासाठी येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराच्या विकासात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. पवार यांना भक्कम साथ देणा-या 85 जुन्या सहकाऱ्यांचा, पक्षाच्या नवनिर्वाचित आठ खासदारांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान लोकशाहीला वाचविण्यासाठी , संविधान रक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करून मोलाचे योगदान देणारे ऍड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचाही सन्मान करण्यात(pimpri) येणार आहे.
भोसरी मतदार संघातील माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघातील भाजपसह इतर पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी लवकरच प्रवेश करणार आहेत. भोसरीतील भाजपचे अनेक माजी नगरसेवक आमदारांच्या कारभाराला कंटाळले आहेत. यातील सात ते आठ जण उघड विरोधाची भूमिका घेत आहेत. या माजी नगरसेवकांसह भाजपचे अनेक माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा कामठे, अजित गव्हाणे यांनी केला आहे.
महापालिकेच्या पाच वर्षाच्या सत्ता काळात आणि भाजप आमदाराच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेतील प्रत्येक कामात रिंग आणि भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत वेळोवेळी आवाज उठवत आंदोलने, मोर्चे काढले. वेळप्रसंगी न्यायालयात गेलो. यानंतर भाजपच्या भ्रष्टाचाराला अंकुश बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नसल्याचे सांगत गव्हाणे म्हणाले, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा गट) पक्षाच्या एखाद्या पदाधिका-याला उमेदवारी दिली तरी आपण त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करू, असेही गव्हाणे यांनी(Pimpri) स्पष्ट केले.