एमपीसी न्यूज – महायुती सरकारची ‘लाडकी बहिणी आणि लाडका भाऊ’ ही योजनाच मुळात फसवी आहे. केवळ (Pimpri )विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ‘चुनावी जुमला’ लोकांसमोर पेश केला आहे. आजपर्यंत महायुती सरकारच्या जवळपास सर्वच योजना म्हणजे गाजरांचाच पाऊस आहेत. गाजरासारख्याच त्या वाजतात आणि मोडून फेकल्या जातात. महायुती सरकारची ‘लाडकी बहिण आणि लाडका भाऊ’ ही योजना म्हणजे ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ या म्हणीला शोभणारी आहे. अशा या रेवडी संस्कृतीला महाराष्ट्रातील जनता कधीही मतांची भिक घालणार नाही, अशी खरमरीत टीका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केल्यानंतर आता महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील लाडक्या भावांसाठी एक विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रूपये तर डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची रक्कम स्टायपंड म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु, या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे सरकार एवढा मोठा निधी कुठून आणणार? हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. मुळात महाराष्ट्राचे कर्ज सातत्याने वाढत असताना तरुणांना पगार कुठून मिळणार? तरुणांना प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड देण्याची योजना पूर्वीपासूनच सुरु आहे. हा सगळा मामला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आहे.
IAS Puja Khedkar : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना सरकारने दिली होती सक्तीची निवृत्ती?
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राची ११ व्या क्रमांकावर घसरण झाली. महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास ८० हजार कोटींचं कर्ज आहे. एक लाख १० हजार कोटींचं कर्ज हे वेगळे आहे. दरडोई उत्पन्न घटले आहे. अशा स्थितीत लोकांची क्रयशक्ती वाढवून आर्थिक स्रोत मजबूत करायचे सोडून या सरकारला भिकारधंदे सुचत आहेत. लोकांनी कामेच करायची नाहीत का? रोजगार कसा वाढणार? डोईवरचं कर्ज कमी करण्याकडे यांचा कल दिसत नाही. त्यामुळे या सरकारच डोकं ठिकाणावर आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.