एमपीसी न्यूज – युनायटेड किंग्डम ( युके) येथे नुकतेच भारतीय संस्कृती आणि भारतीयांचे योगदान साजरे करण्या निमित्त ‘इंडिया वीक’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीय नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये पुण्यातील केक आर्टिस्ट प्राची धबल देब यांचा देखील समावेश होता.
रॉयल आयसिंग या अनोख्या कलेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राची यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर यूके संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सीबीई नवीन शाह यांनी प्राची यांचा सत्कार केला. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात सन्मान होणाऱ्या प्राची या पहिल्या केक कलाकार आहे.
लंडनमध्ये शिकल्यानंतर जवळपास एक दशकाहून अधिक काळ रॉयल आइसिंग या कलेला प्रोत्साहन देणाऱ्या प्राची यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मला ज्या क्षेत्रात खूप आवड आहे, अशा क्षेत्रात माझ्या कामाची दखल घेणे हा सन्मान आहे. हा प्रवास आव्हानात्मक होता पण खूप शिकवणारा पण होता.”
ऑक्सफर्ड विद्यापीठात, प्राची यांचा यूके-इंडिया बिझनेस कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक केविन मॅककोल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सन्मान रॉयल आयसिंग कलेतील प्राची यांचे योगदान अधोरेखित करते.
Pune Accident : पुण्यात माजी उपमहापौरांच्या मुलाच्या एसयूव्हीची टेम्पोला धडक; तीन जखमी
मध्य प्रदेशातील रीवा येथे जन्मलेल्या प्राची यांनी आपले शालेय शिक्षण डेहराडून, उत्तराखंड येथे पूर्ण केले, त्यानंतर त्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोलकत्ता येथे गेल्या. केक बनविण्यात त्यांनी आणलेल्या कलात्मकतेचा त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले यामध्ये लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने प्रमाणित केलेल्या तीन जागतिक विक्रमांची नोंद उल्लेखनीय ठरते. या नोंदींमध्ये मिलान कॅथेड्रलपासून प्रेरित 100 किलोग्रॅम केकची रचना, सर्वाधिक शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्सची रचना आणि भारतीय राजवाड्याची शाकाहारी रॉयल आयसिंगद्वारे तयार केलेली 200 किलो वजनाची खाद्ययुक्त रचना यांचा समावेश आहे.
उत्तम पद्धतीचे केक बनविण्यात हातखंडा असलेल्या प्राची यांनी आपले कौशल्य केवळ नाविन्यपूर्ण केक बनविण्यापुरते मर्यादित न ठेवता, व्हेगन रॉयल आयसिंग’च्या माध्यमातून व्हेगन लाईफस्टाईल अर्थात संपूर्ण शाकाहारी जीवन पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे देखील काम केले आहे. शाकाहारी पर्याय हेदेखील तितकेच व्यापक आणि सुंदर असू शकतात, हे दाखविण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्राची यांनी सांगितले.
सध्या पुण्यातील पिंपरी – चिंचवड येथे राहत असलेल्या या केवळ एक केक आर्टिस्ट नसून, पाक कलेतील कलात्मकता आणि नाविन्यता यांचा उत्तम मेळ असणारे एक अनोखे व्यक्तिमत्त्व असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केक आर्टिस्ट म्हणून त्यांनी केलेले काम हे केवळ प्रेरणादायी नसून, या क्षेत्रासाठी सर्वोच्च मापक तयार करणारे काम आहे.