एमपीसी न्यूज – मुलगी दोन महिन्यांची असतानाच तिच्या आई-वडिलांना विश्वासात न घेता आजोबांनी तिचा विवाह ठरवला. मात्र मुलीच्या आई-वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. तरी देखील मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर लग्नासाठी दबाव आणत संपूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने राजस्थानचे मुख्यमंत्री, जोधपूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे कैफियत(Rajasthan) मांडली आहे.
जोधपूरचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांची पीडित तरुणीने भेट घेतली. विकास कुमार यांनी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच पुढे योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन(Rajasthan) दिले.
याबाबत माहिती अशी की, राजस्थान मधील लोहारवा येथील एका तरुणीने याबाबत आपली कैफियत मांडली आहे. तरुणी बाल्यावस्थेत असताना रामजीवन उर्फ धोलिया जागू आणि त्याचे वडील किशनराम जागू यांनी मुलीच्या घरी जाऊन तिचा रामजीवन याच्यासोबत विवाह ठरवला. यावेळी मुलीच्या आई वडिलांना दोरीने बांधून ठेवले होते. मुलीच्या आजोबांनी हा विवाह ठरवला होता. हा विवाह मुलीच्या आई-वडिलांना मान्य नव्हता. यानंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय कधीही रामजीवन याच्या घरी गेले नाहीत. अथवा त्यांच्याशी संबंध ठेवला नाही.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रामजीवन, त्याचे वडील किशनराम जागू, नातेवाईक हरदानराम भादू, कोजा बाबू, किशनराम जागू राजू, किशनराम जागू सुरेश, किशनराम जागू रामचरण, किशनराम जागू श्रवण, वीरधाराम ढाका, कालूराम ढाका, कालूराम डारा यांनी मुलीच्या आई वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीचा विवाह रामजीवन याच्यासोबत लावून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला.
पीडित मुलीच्या वडिलांचा व्यवसाय आहे. मुलगी वडिलांच्या दुकानात बसली असताना रामजीवन आणि त्याच्या नातेवाईकांनी मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. तसेच मुलीचा विवाह रामजीवन याच्यासोबत लावून न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. सतत होणाऱ्या या त्रासाला संपूर्ण कुटुंब त्रासले आहे.या प्रकरणी मुलीने मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली. बाडमेरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. याप्रकरणी धोरीमन्ना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.