एमपीसी न्यूज – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वर डाऊन झाल्याने जगभरात (Microsoft Server Down)अनेक ठिकाणी संगणक, लॅपटॉपच्या स्कीन निळ्या पडल्या. याचा बँक, विमान सेवा इतर महत्वाच्या घडामोडींवर मोठा परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्वरवर हा सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जगभरात सर्वच ठिकाणी मायक्रोसॉफ्टची कार्यप्रणाली शुक्रवारी (दि. १९) दुपारी बारा वाजताच्या सुमारास अचानक कोलमडली. मायक्रोसॉफ्टला आधुनिक सायबर सुरक्षा देणाऱ्या क्राउडस्ट्राईकचे अपडेशन करताना ही यंत्रणा कोलमडली. अचानक दुपारी बारा वाजताच्या सुमारास मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम असलेले संगणक, लॅपटॉप बंद पडले. पूर्ण स्क्रीन निळी पडली.
बँक, विमानसेवा यांसह अति महत्वाच्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. अचानक ही सर्व यंत्रणा ठप्प झाली. भारतात इंडिगो, स्पाईस, अकासा या एअरलाईन्सला याचा फटका बसला आहे. दिल्ली, मुंबई येथील विमानांच्या उड्डाणांच्या वेळा बदलण्यात आल्या. विमानतळावर चेक इन, बोर्डिंग पास यासाठी अडचणी आल्या.
IAS Puja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; युपीएससीकडून कारणे दाखवा नोटीस
मुंबई, दिल्ली, बेंगलोर, गुरुग्राम येथील कंपन्यांमध्ये अचानक स्क्रीन निळी पडली. त्यावर stop एरर आला. हा एरर विंडोजच्या सुरक्षेला धोका असेल आणि जबरदस्तीने संगणक, लॅपटॉप बंद करायचा असेल तरच येतो. या एरर मुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
आपल्याकडे असलेले मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक चालू केले की चालू होतील, हा भ्रम आपल्याला दूर केला पाहिजे. यामध्ये असलेली ऑपरेटिंग सिस्टीम देखील कधीतरी बंद पडू शकते. तिच्यावरही हल्ला होऊ शकतो. अशा प्रकारचे हल्ले आणि घटना भविष्यात होत राहतील. सध्या तांत्रिक प्रगतीचे महत्व वाढले आहे. त्यामुळे त्यावर आधारित सर्वच गतिविधींचे बॅकअप, डिझास्टर रिकव्हरी मॅनेजमेंट हे आपल्याला करावे लागणार आहे, असे मत सायबर तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.