एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील डेंग्यूसारख्या किटकजन्य आजाराचा (Pimpri)प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मोहिम हाती घेतली आहे. प्रत्येक आठवड्यातील 1 दिवस 1 तास ही मोहिम नागरिकांच्या घरांभोवतालची डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी हाती घेतली आहे. नागरिकांनी आपापल्या घरी व घरा भोवतीच्या परिसरात “प्रत्येक रविवारी” स्वच्छता करून, पाण्याची डबकी नष्ट करावीत व कच-याची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. शहरातील डेंग्यूची रुग्णसंख्या 23 वर पोहोचली आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक आठवड्यातील 1 दिवस 1 तास ही मोहिम नागरिकांच्या घरांभोवतालची डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी हाती घेतली आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
PCMC : नवीन आढळणा-या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर
डेंग्यू आजाराला रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यावश्यक आहे. डेंग्यूला रोखणे हे महापालिकेचे उद्दिष्ट असून नागरीकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि आंतरविभागीय समन्वय राखण्यासाठी बीट डेंग्यू मोहिम उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्वाचा असून डेंग्यूला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण आठवडाभर विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय आणि खाजगी रुग्णालये येथे डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करणे, पॅम्प्लेट वितरित करणे आणि मार्गदर्शक सूचनांच्या प्रसारासाठी बैठकांना उपस्थित राहणे याचा समावेश असेल. सरकारी आणि खाजगी कार्यालयांत देखील डास उत्पत्ती स्थळ तपासणी, जनजागृती, व्याख्याने आणि पॅम्फ्लेट वाटप याचा समावेश असेल. प्रार्थनेच्या वेळी शाळांमध्ये डेंग्यू जागरूकता व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप प्ले केला जाईल , डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करणे, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने आणि रॅली यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.