एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या (Pune)उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महिला विभागात पुणे ग्रामीण, रत्नागिरी, मुंबई उपनगर पूर्व या संघानी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रेवश केला.
पुणे ग्रामीण संघाने सांगली संघावर 46-23 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे 21-8 अशी आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या सलोनी गजमल हिने सुरेख खेळ केला. तर मंदिरा कोमकर हिने पकडी घेतल्या. सांगली संघाच्या श्रध्दा माळी हिने एकाकी लढत दिली. रत्नागिरी संघाने पालघर संघावर 26-24 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला रत्नागिरी संघ 8-10 असा पिछाडीवर होता. रत्नागिरीच्या सिध्दी चाळके, समरिन बुरोडकर यांनी चढाया केल्या. तर तस्मिन बुरोडकर हिने पकडी घेतल्या.
पालघरच्या जुली मिस्किता ऐश्वर्या पाटील यांनी चांगली लढत दिली. तर श्रुती सोमासे व पुजा पाटील यांनी पकडी केल्या. तिसऱ्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्व संघाने ठाणे शहर संघावर 33-15 अशी मात करीत उपात्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला मुंबई उपनगर पूर्व संघाकडे 13-8 अशी आघाडी होती. मुंबई उपनगर पूर्वच्या हरजित सिंधु व याशिका पुजारी यांनी आक्रमक खेळ केला. तर शुभदा खोत व समृध्दी मोहिते यांनी सुरेख पकडी घेतल्या. ठाणे शहरच्या माधुरी गवंडी प्राजक्ता पुजारी यांनी उत्तम चढाया केल्या. तेजस्वी फाळके व रेखा चिकणे यांनी पकडी घेतल्या.
अत्यंत अटितटीच्या झालेल्या चौथ्या सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने पुणे शहर संघाचा 31-30 असा अवघ्या एक गुण फरकाने विजय मिळविला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 19-16 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या मानसी रोडे, पूजा शेलार यांनी आक्रमक खेळ केला. तर भूमिका गोरे व सविता गवई यांनी पकडी घेतल्या. पुणे शहराच्या आम्रपाली गलांडे व प्रतीक्षा कऱ्हेकर यांनी मध्यंतरानंतर आक्रमक खेळ केला. परंतू त्यांना पराभव पत्करावा लागला. अंकिता चौहान व सिध्दी मराठे यांनी पकडी घेतल्या.
तत्पूर्वी उपउपांत्य पूर्व फेरीचे सामने खेळविण्यात आले. या सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे- पुणे शहर वि.वि. सातारा(46-15), रत्नागिरी वि.वि. सिंधुदुर्ग(60-12), पिंपरी चिंचवड वि.वि. मुंबई उपनगर पश्चिम(20-19), मुंबई उपनगर पूर्व वि.वि. मुंबई शहर पश्चिम(28-26), ठाणे शहर वि.वि.नंदुरबार(40-32), सांगली वि.वि. नासिक शहर(36-28), पुणे ग्रामीण वि.वि. कोल्हापूर(63-21), पालघर वि.वि. मुंबई शहर पूर्व (42-40).