Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 7:25 am

MPC news

Maval : मावळला अधिकचा निधी मिळत असताना, कोणीही खोडा घालू नये, सुनील शेळके यांनी थेट सुप्रिया सुळे यांना सुनावले

एमपीसी न्यूज – मावळलाच सर्वाधिक निधी का दिला जातो, असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Maval)पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केल्यामुळे पुण्यात आज झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत आज जोरदार खडाजंगी झाली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सुळे यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. मावळला अधिकचा निधी मिळत असताना कोणीही खोडा घालू नये, या शब्दांत शेळके यांनी त्यांना सुनावले.

उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही या बैठकीस उपस्थित होते. बैठकीत बोलताना खासदार सुळे यांनी त्यांच्या भाषणात ‘मावळला सर्वाधिक निधी दिला जातो’, असा किमान पाच ते सहा वेळा उल्लेख केला. त्यामुळे आमदार शेळके संतापले. बारामतीला जास्त निधी मिळत होता, तेव्हा आम्ही कधी एका शब्दाने बोललो का, असा सवाल करीत त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना ठणकावले. आमदार शेळके यांचा रुद्रावतार पाहून आपण मावळ तालुक्याविषयी नाही तर मावळ लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत असल्याची सारवासारव खासदार सुळे यांना करावी लागली.

Alandi :दहा लाख रुपयांची खंडणी मागत बाप लेकाला मारहाण

बैठकीतून बाहेर पडल्यानंतर सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली.  इतर तालुक्यांनाही निधी मिळावा, अशी आमची देखील भावना आहे. परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण कोणताही खोडा घालू नये, अशी माझी विनंती आहे, असे सुनील शेळके म्हणाले. मावळच्या विकासासाठी आपण पाठपुरावा करतो. विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करून ते मंजूर करून घेतो. आपली तळमळ बघून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मावळच्या विकासासाठी सातत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे मावळला सर्वाधिक निधी देण्याबाबत कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

आपली बांधिलकी ही मावळच्या जनतेशी आणि मावळच्या विकासाशी आहे. मावळच्या विकासाला जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी आपण यापुढेही प्रयत्न चालूच ठेवू. आम्ही अन्य तालुक्यांना निधी मिळताना कधीही विरोध केलेला नाही. मावळला अधिकचा निधी मिळत असताना कितीही मोठा नेता असला तरी त्याचा विरोध खपवून घेतला जाणार नाही, असे  शेळके म्हणाले.  मावळ तालुका हा मावळ लोकसभा मतदारसंघाचाच भाग आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत देखील खासदार सुळे यांनी बोलण्याचे काहीही कारण नव्हते. ती त्यांची निव्वळ सारवासारव होती, असा टोलाही शेळके यांनी लगावला.

सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

आमदार सुनील शेळके यांनी आपले भाषण पूर्ण ऐकले नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा सर्वांचा डीपीडीसीचा अनुभव चांगला राहिलेला आहे. पहिल्यादांच असं झालय. आम्ही यामध्ये श्रीरंग बारणे यांचंही मार्गदर्शन घेतलं. कदाचित असंही होतं असेल की, माझ्याकडून आणि अमोल कोल्हेंकडून काही कमतरता राहत असतील. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना जास्त झुकते माप दिले जाते. त्यामुळे आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा हे देखील सांगा, असे म्हटले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुनील शेळके यांनी माझे पूर्ण वक्तव्य ऐकले नाही. मी असे म्हटले की, मावळला निधी दिला. त्याबद्दल आमचे आभार आहेत. कारण मावळ हा जिल्ह्याचा आणि मतदारसंघातील महत्वाचा तालुका आहे. जो न्याय तुम्ही मावळला देता तोच न्याय तुम्ही बारामती आणि शिरुरला द्या, एवढीच आमची अपेक्षा होती, पण सुनील शेळके नाराज झाले’. ‘आत्तापर्यंत बारामतीला खूप दिलंय. तेव्हा आम्ही कुठे बोललो, असे आमदार शेळके म्हणाले, पण त्यावर उत्तर देणे मला फारसे महत्वाचे वाटले नाही. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले आहेत. ही लोकशाही आहे. सर्वांशी लढाई ही वैचारिक आहे, वैयक्तिक नाही’, असे खासदार सुळे म्हणाल्या.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर