एमपीसीन्यूज – ससून रुग्णालयातील बेवारस रुग्णांना ‘ससून’मधील (Pune)डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी केली. त्यांच्या मागणीची त्वरित दखल घेत ‘ससून’मधील एका डॉक्टरचे निलंबन करण्यात आले.
बेवारस रुग्णांना ‘ससून’मधील डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांची आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी भेट घेतली. संबंधित डॉक्टरांना निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. निलंबन झाले नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे सबंधित दोषी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Pimpri : पिंपरी न्यायालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडून देतात. काही दिवसांनी हेच डॉक्टर रुग्णांच्या शरीराचे अवयव विक्री करण्यास देखील मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांचे तातडीने निलंबन झाले पाहिजे. त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. खासगी रुग्णालयातील दर परवडत नाहीत म्हणून अनेक रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात. पण सरकारी रुग्णालयात होणारी पिळवणूक, मिळणारी अपमानास्पद वागणूक वाढत चालली आहे. त्यातूनच हा निर्जनस्थळी सोडून देण्याचा प्रकार घडला आहे, जो डॉक्टरांमधील असंवेदनशीलता दाखवणारा आहे.
मंत्री महोदय कधी येणार?
ससून रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे हे रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. येथे गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. या दोन्ही कारणांमुळे ‘ससून’चा लौकीक खालावत आहे, अशी व्यथा मी अधिवेशनात बोलून दाखवली होती. ससून हॉस्पिटलचा कारभार कधी सुधारणार? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ससूनमध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेवून प्रश्न निकाली काढू, येथे सर्व कामकाज सुरळीत आहेत, असे त्यांनी सांगितले होते. हे ‘सुरळीत कामकाज’ पाहण्यासाठी आणि बैठक घेण्यासाठी मंत्री महोदय कधी येणार आहेत?, असा सवाल आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी उपस्थित केला.