एमपीसी न्यूज – मावळातील सर्व शाळांना नव्हे तर फक्त अतिवृष्टी असलेल्या व येण्या – जाण्याची गैरसोय असलेल्या भागातील शाळांना उद्या (गुरुवारी) सुट्टी राहील (School Holiday) , असे स्पष्टीकरण मावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी केले आहे.
मावळात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे गुरुवारी मावळातील सर्व शाळांना सुट्टी राहील, अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये सुट्टी बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासंदर्भात एमपीसी न्यूजने गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी शाळेला देण्यात आलेल्या सुट्टी (School Holiday) बाबत संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे तरी याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, मावळ तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन व शाळा व्यवस्थापन यांनी परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Kasarsai Dam : कासारसाई धरणाच्या संडव्यातून विसर्ग सुरू; सखल भागातील गावांना सतर्कतेचा इशारा
गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी म्हटले आहे की, मावळ परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. त्यानुषंगाने विद्यार्थी सुरक्षा विचारात घेऊन तहसीलदार व वरिष्ठ कार्यालय यांच्या सूचनेनुसार मावळ तालुक्यातील अतिवृष्टी व येण्या-जाण्याची गैरसोय असलेल्या भागातील शाळांना त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच यांच्या चर्चेनुसार विद्यार्थी सुरक्षिततेचा विचार करून मुख्याध्यापक यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळेला सुट्टी (School Holiday) देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. शिक्षक व कर्मचारी यांनी परिस्थिती पाहून शालेय कामकाज सुरू ठेवावे.
ह्या सूचना इयत्ता 1ली ते 12वी तसेच पूर्व प्राथमिक वर्ग असलेल्या अति पर्जन्यमान असलेल्या भागातील शाळांसाठी लागू आहेत.