एमपीसी न्यूज – शहराला डेंग्यूमुक्त करण्यासाठी शहरात सर्वत्र अभियान राबविण्यात (PCMC)येत आहे. यासाठी बीट डेंग्यू म्हणजेच डेंग्यूमुक्त पिंपरी-चिंचवड शहर अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साफसफाई करून सक्रीय सहभाग नोंदवावा आणि आठवड्याभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत नागरिकांना माहिती देऊन जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच शहरातील नागरिकांनी देखील डेंग्यूबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व सरकारी व खाजगी कार्यालये, मनपा कार्यालये, सरकारी व खाजगी बँका येथे “डेंग्यू मुक्त पिंपरी-चिंचवड (BEAT Dengue Campaign)” मोहिमेअंतर्गत डास नियंत्रणबाबत कार्यवाही व साफसफाई करण्यात आली. तसेच पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्येही आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन डास नियत्रंणासाठी पाहणी करून साफसफाई केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. सुनिता साळवे, डॉ. शिवाजी ढगे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या या किटकजन्य रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या वतीने बीट डेंग्यू अभियानाअंतर्गत संपुर्ण आठवड्याभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातील विविध रोपट्यांच्या कुंड्या, पाणी साठवणूकीची भांडी, फ्रिज, एसी, पाणी साठणारी ठिकाणे तसेच इत्यादी ठिकाणची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आणि साफसफाई केली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी किटकनाशक फवारणी करून पाणी साठणारी ठिकाणेही कोरडी केली.
Maval : जुलै अखेर भात लागवड पूर्ण होईल
बीट डेंग्यू अभियानाअंतर्गत सर्व सरकारी आणि खाजगी शाळेत साफसफाई करण्यात येणार असून कीटकजन्य आजार आणि डेंग्यू बाबत जनजागृतीपर व्याख्याने तसेच चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रॅली, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असून एल.ई.डी. स्क्रीनच्या माध्यमातून डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत व्हिडीओ दाखविण्यात येणार आहेत. यासोबतच परिसंवाद आणि चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
शुक्रवारी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व उद्यानांची साफ सफाई आणि डासोत्पत्ती स्थळांची तपासणी करण्यात येणार आहे. महिला आरोग्य समिती, आशा स्वयंसेविका, ए.एन.एम यांच्यामार्फत सामाजिक जनजागृती करण्यात करण्यात येणार असून यासाठी सार्वजनिक गणेश मंडळ, सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संघ यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
शनिवारी मॉल, उद्याने, सिनेमागृह याठिकाणी डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येणार असून हस्तपत्रिका वाटप, मॉलमधील एल.ई.डी. स्क्रीनच्या माध्यमातून तसेच पथनाट्य याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तर “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी दर रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत घरातील पाणी साठवणूकीची साधने स्वच्छ व कोरडी करून एक तास स्वत:साठी व कुटुंबियांसाठी देण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.