एमपीसी न्यूज – संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत आहे. संभाव्य धोका विचारात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह(Pimpri-Chinchwad) यांनी केले आहे.
अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या निर्देशानुसार मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी हे शहरातील घाटांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शहरातील नदीकाठच्या असणाऱ्या वस्त्यांमध्ये महानगरपालिकेचे पथक(Pimpri) बारकाईने लक्ष ठेवून असून तेथे आवश्यक आपत्कालीन यंत्रणा देखील तैनात ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता पूरपरिस्थिती उद्भवल्यावर नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले(Pimpri-Chinchwad) आहे.
PCMC : महापालिकेच्या 118 शाळांमध्ये 23 समुपदेशकांची नियुक्ती
आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष 24X 7( 24तास 7 दिवस) कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.