एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह प्रामुख्याने मुळशी, मावळ, खेड तालुक्यांमध्ये अभूतपूर्व अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा वीजयंत्रणा (MahaVitaran) फटका बसला आहे. वीजयंत्रणा व अनेक सोसायट्यांमधील मीटरबॉक्स पाण्यात असल्याने विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून 13 वीजवाहिन्यांसह 699 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे विविध भागातील सुमारे 84 हजार 600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
वीजयंत्रणेत बिघाड झाला आहे त्याठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणकडून (MahaVitaran) युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र गुरुवारी (दि. 25) दुपारी उशिरापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने दुरुस्ती कामात मोठे अडथळे येत होते. तसेच पाण्यात असलेली वीजयंत्रणा तसेच सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद ठेवलेल्या सोसायट्या किंवा परिसरातील वीजपुरवठा पाण्याचा निचरा झाल्यानंतर व पाहणी करून सुरु करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अतिवृष्टी तसेच खडकवासला धरणातून गुरुवारी (दि. 25) पहाटेपर्यंत तब्बल 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे प्रामुख्याने नदीकाठच्या परिसरात व सोसायट्यांमध्ये व मीटर बॉक्समध्ये पाणी शिरले. यामुळे प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, पुजापार्क, गायत्री अपार्टमेंट, जलतरंग अपार्टमेंट, राधाकृष्ण रेसिडेन्सी, कुदळे पाटील, द्वारका अपार्टमेंट, आनंद पार्क, स्काय अपार्टमेंट, साई अपार्टमेंट, सिद्धी अपार्टमेंट, जलपुजन अपार्टमेंट, शामसुंदर अपार्टमेंट आदींसह हिंगणे, किरकटवाडी, स्वारगेट, धायरी, वडगाव, नवी पेठ आदी भागातील सुमारे 38 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासोबतच शहरातील वडगाव शेरी, नगररोड, विश्रांतवाडी परिसरातील 17 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
Talegaon-Chakan Road : दिवसा अवजड वाहनांना परवानगी दिल्याने अपघात अन वाहतूक कोंडीत वाढ
शिवाजीनगरमध्ये चव्हाणनगर, बालाजीमंदिर, बिवर्ली हिल्स, वाकडेवाडी परिसर, शिंदे गार्डन, अयोध्यानगरी, सिंध सोसायटी, खडकीमधील राजीव गांधीनगर व परिसर, रास्तापेठ, भवानीनगर, जुनाबाजार, मेलवानी कंपाऊंड, मनीष पार्क सोसायटी, कोंढवा, पिसोळी रोड, खडी मशीन चौक, वानवडी, वारजे, कर्वेनगर आदी भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच काही भागात झाडाच्या फांद्या व फिडर पिलरमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.
वीजयंत्रणेत पाणी शिरल्यामुळे निगडी येथील घरकूल व ओटा स्कीमचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सेक्टर चारमधील मातोश्रीनगर, रावेत येथील नदीकाठचा परिसर, सांगवी, हिंजवडी, दापोड, खराळवाडी आदी भागातील सुमारे 55 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे प्रामुख्याने मावळ व मुळशी तालुक्यातील वीजयंत्रणेला फटका बसला आहे. मुळशी तालुक्यात 30 ते 40 वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे 105 रोहित्रांवरील 10 ते 12 गावांचा व सुमारे 2600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच मुळा नदीकाठच्या परिसरात भुकूम, भुगाव, माण व मारुंजी गावांतील 29 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला.
Pune : पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत
आळंदी शहरात इंद्रायणी नदीचे पाणी शिरल्याने दोन रोहित्रांचा तसेच वडगाव शिंदे गावाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाईट येथे दोन वीजखांब पडल्याने दोन गावांचा तसेच कामशेत, लोणावळा, कार्ला, वडगाव, तळेगाव परिसरातील 18 ते 19 गावांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा धोका कमी झाल्यानंतर या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
महावितरण ‘हाय अलर्ट’वर
पुणे परिमंडल अंतर्गत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे सुरळीत वीजसेवा व वीज सुरक्षेसाठी महावितरण ‘हार्य अलर्ट’वर आहे. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी पहाटेपासूनच दर तासाला वीजपुरवठ्याचा (MahaVitaran) आढावा घेण्यास सुरवात केली आहे. सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी सतर्क व ऑनफिल्ड राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुख्य अभियंता पवार यांनी आज हिंगणे, डेक्कन, विश्रांतवाडी आदी परिसरात विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. तसेच वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांबाबत निर्देश दिले. यावेळी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पुरस्थितीमुळे अत्यंत खडतर परिस्थितीत बुधवारी (दि. 24) रात्रीपासून भर पावसात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंता, कर्मचारी राबत आहेत. काही ठिकाणी झाडे व मोठ्या फाद्या पडल्याने वीजयंत्रणा नादुरुस्त झाली. त्यामुळे रात्रभर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु होते. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून वीजयंत्रणेच्या दुरुस्तीच कामे करावी लागत आहेत. अतिवृष्टी व पुराच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.