एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील भोसरी, चिखली, रावेत आणि पिंपरी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे. तसेच मागील 24 तासात शहरात 14 ठिकाणी झाडे(Pimpri-Chinchwad) पडली.
गुरुवारी (दि. 25) पहाटे साडेतीन वाजता पुनीत इंजीनियरिंग (भोसरी) या कंपनीमध्ये पाणी शिरले. त्यानंतर अर्ध्या तासात जुना काटे पिंपळे रोड पिंपरी गावठाण येथे घरामध्ये पाणी शिरले. पहाटे साडेपाच वाजता गणेश नगर, इस्कॉन मंदिराजवळ, रावेत येथे घरामध्ये पाणी शिरले. त्यानंतर सकाळी सहा वाजता सेक्टर नंबर 19 आकुर्डी चिखली रोड, साने चौक, चिखली येथे घरात पाणी शिरले.
तर शहरात एका रात्रीत तीन ठिकाणी झाडे पडली. झाड पडण्याची पहिली घटना बुधवारी (दि. 24) रात्री पावणेअकरा वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर, सिद्धिविनायक चौक, भोसरी येथे घडले. देहूरोड-निगडी रस्त्यावर पहाटे पावणेतीन वाजता एक झाड पडले. शिवार चौक, पिंपळे सौदागर येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता झाड पडले. बुधवारी दिवसभर 11 ठिकाणी झाडे(Pimpri-Chinchwad) पडली.
खडकी येथे पुलाखाली पाणी आल्याने एक जण अडकून पडला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली. तसेच इंद्रायणी नगर भोसरी येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. वेळीच आग विझवून अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठी दुर्घटना टाळली.