एमपीसी न्यूज -मावळ भाग, धरण क्षेत्र भाग (Alandi) व इतर सर्वत्र काही भागात गेले पाच सहा दिवस संतत पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन काल दि.25 रोजी आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला होता. नदीकाठच्या जवळील धर्मशाळेत, घरा मध्ये नदी पात्राचे पाणी शिरले होते. नदीपात्राचे पाणी घरातील खोलीतील व धर्मशाळेतील खोलीत शिरल्याने त्या खोल्यां मध्ये चिखल गाळाचा राडा झालेला होता.तो स्वच्छ करताना नागरिक दिसत होते.तसेच त्या खोल्यांमधील विविध वस्तू साहित्य पुराच्या पाण्याने भिजल्याने नुकसान झाले आहे.
ज्ञानेश्वरी मंदिर शेजारी आजरेकर फड आळंदी पंढरपूर संस्था आहे या संस्थेत सुद्धा पुराचे पाणी शिरले होते.या संस्थेतील विद्यार्थी माऊलींच्या परतीच्या वाटेवर आहेत. काल इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी संस्थेत शिरल्याची वार्ता तेथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी योगेश जाधव यांना कळाली.आज दि.26 रोजी ते आळंदीतील त्या संस्थेत आले.त्यांच्या खोलीतील अभ्यासिकेसाठी असलेले जुने धार्मिक ग्रंथ तसेच विविध धार्मिक पुस्तके ,चार पाच पखवाद,पेटी ,कपडे अश्या विविध वस्तू भिजून नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले या संस्थेत अजून रहिवाशी असून ते परतीच्या वारीच्या वाटेवर आहेत त्यांच्या खोल्यांमध्येही पुराचे पाणी होते,. त्यामुळे त्या खोल्यांमधील सुद्धा वारकरी साहित्य वस्तू पुस्तके ,इतर वस्तू आहेत त्यांचे ही नुकसान झाले आहे.आळंदी नगरपरिषद हद्दीत इंद्रायणी नदीची पातळी वाढल्याने पूर परिस्थती निर्माण झाली होती नदी किनारी भागात असलेल्या एका कुटुंबाचे प्राण आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सतर्कते मुळे वाचले . त्या( धुमाळ) कुटुंबाच्या संस्थेच्या खोलीत सुद्धा पाणी शिरले होते. त्यांच्या खोलीतील विविध धार्मिक पुस्तके व इतर वस्तू भिजल्या आहेत.त्यांचा व्यवसाय धार्मिक पुस्तके विक्रीचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पुरामुळे ज्ञानेश्वरी मंदिर,देविदास धर्मशाळा अश्या नदी काठच्या भागातील परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने विविध साहित्य वस्तूंचे नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वरी मंदिरात पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात धार्मिक पुस्तके , वारकरी साहित्य वस्तू, जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य वस्तू भिजल्या आहेत.
माऊली बागेत पाणी शिरून जनावरांसाठी असलेल्या खाद्याचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने इंद्रायणी नदीवरील चार ही पुल रहदारी साठी खुले करण्यात आले आहे.