एमपीसी न्यूज – पवना धरण क्षेत्रात अति मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची गढुळता वाढली आहे. त्यामुळे पाणी शुध्द करण्यास विलंब लागत असल्याने तांत्रिक अडचणीमुळे पिंपरी- चिंचवड (PCMC) शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
पवना धरण परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे नदीच्या पाण्याची गढूळता वाढली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी देखील अद्याप पूर्ण भरलेल्या नाहीत. टाकी भरण्याचे काम चालू आहे. त्यामुळे आजचा सर्वच भागाचा होणारा पाणी पुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल व कमी वेळ राहील. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर चालू असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
MahaVitaran : पावसाळ्यात वीज सुरक्षिततेची अशी घ्या काळजी, महावितरणकडून उपाय व सूचना जाहीर
पाणी उकळून प्यावे
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत (PCMC) आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि, दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करुन घ्यावी व पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून घेण्यात यावे. ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळता येईल, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.