एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त म्हणून (PMRDA) योगेश म्हसे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आता कार्यपद्धतीत सुधारणा करीत प्रक्रिया सुलभीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती दिली. दि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ आर्किटेक्टस्, पुणे यांच्या वतीने म्हसे यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
नुकतेच दि इंडियन इंस्टीट्युट ऑफ आर्किटेक्टस् च्या पुणे विभागातील पदाधिकाऱ्यांनी(PMRDA) म्हसे यांची भेट घेऊन त्यांचे नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करीत स्वागत केले. यावेळी दि इंडियन इंस्टीट्युट ऑफ आर्किटेक्टस् च्या पुणे विभागाचे अध्यक्ष विकास अचलकर, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र ठक्कर, विशाल जाधव, मिलिंद पांचाळ, विवेक गारोडे, पराग देशपांडे, मंगेश गोटल, शैलेश दंदणे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना विकास अचलकर म्हणाले, “प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये अनेक क्लिष्टता होत्या. त्या दूर करीत प्रक्रिया सुलभ करणे फार महत्त्वाचे होते. या संदर्भात वेळोवेळी आयआयएने पीएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच या प्रश्नामध्ये लक्ष घातले आणि अंमलबजावणी सुरु केली ही बाब कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना देखील दिल्या. शिवाय या सुधारणा होत असताना येणाऱ्या समस्या, नवे बदल यासाठी वास्तुविशारदांनी एकत्र येत सुसंवाद समिती गठन करावी, असे सुचविले आहे.”
आयुक्तांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून आम्ही आयआयएच्या वतीने त्याचे स्वागत करती. याद्वारे प्रकरणे प्रलंबित राहून नागरिकांना होणारा नाहक त्रास दूर होण्यास मदत तर होईलच शिवाय कामकाजात सुधारणा होईल, असा विश्वास असल्याचेही अचलकर यांनी नमूद केले.