एमपीसी न्यूज – सध्या महिला आशिया कप-2024 स्पर्धा अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेचा थरार रंगला आहे. आता क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा आहे ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. या सामन्यात कोण बाजी मारणार आणि महिला आशिया चषक-2024 वर कोणता देश नाव कोरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, ऐनवेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.
महिला आशिया चषकाची अंतिम लढत 28 जुलै रोजी होणार असून या लढतीत श्रीलंका आणि भारत आमने-सामने आहेत. हा सामना अगोदर संध्याकाळी 7 वाजता होणार होता. पण याच वेळेला भारत आणि श्रीलंका पुरूष क्रिकेट संघांमध्ये दुसरा टी-20 सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही सामने एकाच वेळी चालू होऊ नयेत, तसेच क्रिकेटरसिकांना या दोन्ही सामन्यांचा आनंद लुटता यावा यासाठी महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना संध्याकाळी 7 ऐवजी दुपारी 3 वाजता चालू होणार आहे.
C P Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
आशिया महिला चषक स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेतील डॅमबुला येथील रंगिरी डॅमबुला इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार असून या सामन्यात होमग्राऊंडवर भारताला नमवून इतिहास रचण्याची संधी श्रीलंकेच्या संघाला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला धुळ चारत आशिया चषक स्पर्धेवर आठव्यांदा नाव कोरण्याची नामी संधी भारतीय संघाकडे आहे.