एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना अडवून त्यांच्यावर जीवघेणा ( Bhosari )हल्ला केला. तसेच साथीदारांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले होते. त्यामधील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला व त्याच्या चार साथीदांराना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
सुरूज प्रकाश रणदिवे (वय 30, रा. घरकुल चिखली), अथर्व उदय पकाले (वय 20, भोसरी), प्रतीक ज्ञानेश्वर सपकाळ (वय 28, वाकड), चेप्या उर्फ केतन गौतम सोनवणे (वय 26, मिलींदनगर) व लकी उर्फ लखन उर्फ सुनिल रामभाऊ पवार (वय 24, काळाखडक झोपडपट्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Today’s Horoscope 2 August 2024 : आजचे राशीभविष्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी एमआयडीसी भोसरी येथे फैज फहिम शेख व त्यांचा मित्र विशाल गौतम हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी संशयित आरोपी अथर्व पकाले याने त्याच्या दोन साथीदारांसह ( Bhosari )दुचाकीवरून येत फिर्यादी फैज शेख यांच्या दुचाकीला आडवी दुचाकी लावली. दुचाकीवरून आलेल्या सुरज रणदिवे याच्या सोबतच्या दोन अनोळखी व्यक्ती व तिसऱ्या दुचाकीवरून आलेल्या विवेक नाईक याच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी फैज शेख यांना ‘तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय’ असे म्हणून ‘थांब आता तुला जींवत सोडत नाही, तुला ठार मारतो’ असे म्हणून त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यात ठिकठिकाणी मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच जुन्या वादाच्या कारणातून लाथाबुक्यांनी मारहाण केली. फैज शेख यांचा मित्र विशाल गौतम याला देखील शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी विवेक विनोद नाईक उर्फ सोन्या (वय 20, खंडेवस्ती भोसरी) व सौरभ कानिफनाथ भोपाले (वय 20, रा. भोसरी) यांना अटक केली होती. तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते. मात्र, यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या सुरज रणदिवे व त्याचे साथीदार फरार झाले होते. सूरजवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याच्यासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, राजू जाधव, संयज जरे, स्वप्निल शेलार, गणेश बोऱ्हाडे, राहूल लोखंडे, जीवन बिराजदार, प्रविण मुलुक, नितीन खेसे, विशाल काळे, भागवत शेप, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर, अनिकेत कांबळे यांनी ( Bhosari ) केली.