Explore

Search
Close this search box.

Search

February 11, 2025 10:33 am

MPC news

Pimpri : इंद्रायणी नदी काठच्या नागरिकांचे ‘सुरक्षितस्थळी स्थलांतर’;आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह यांची ‘ऑनफिल्ड’ पाहणी

एमपीसी न्यूज – मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे व पवना धरणातून (Pimpri)सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत इंद्रायणी नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली.

दरम्यान, इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली असून, आज दुपारी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परपरिस्थितीची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त् आण्णा बोदाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील विविध ठिकाणच्या जवळपास १ हजाराहून अधिक नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच मदत व बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक शहरात दाखल झाले असून बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड या यंत्रणांना देखील सज्ज ठेवली आहे.

Pune : पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशी, चऱ्होली, चिखली, कुदळवाडी मोई, भोसरी परिसरात आमदार लांडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नदी काठच्या परिसरात पाहणी केली. स्थानिक नागरिक आणि जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील याकामी महापालिका प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आवाहन केले. तसेच पोलीस यंत्रणा आणि महापालिका आपत्कालीन यंत्रणा यांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी : आयुक्त शेखर सिंह

सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात यंत्रणा सज्ज ठेवून आवश्यक ठिकाणी तात्काळ प्रतिसाद पथके पाठवून परिस्थिती हाताळावी. निवारा केंद्रात असलेल्या पुरबाधितांना भोजनासह आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच वैद्यकीय पथकाने आपले पथक कार्यरत ठेवून निवारा केंद्रातील नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील अतिमुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना केल्या आहेत. शहरातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनी अतिवृष्टीच्या काळात काळजी घ्यावी. आपत्तीच्या काळात मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन- 9379909090 वर संपर्क करावा. नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्त नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन लांडगे यांनी केले.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर