एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पवना धरणात 23 जून(Maval) रोजी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर महिनाभराने त्याच्या पालकांनी राज्य शासनाला नोटीस पाठवली आहे. पालकांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अद्वैत सुदेश वर्मा (वय 18, रा. विमान नगर, पुणे. मूळ रा. मयूर विहार, पूर्व दिल्ली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अद्वैत पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तो त्याच्या पाच मित्रांसोबत 23 जून रोजी पवना धरण परिसरात फिरायला आला होता. फांगणे येथे तो धरणाच्या पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने अद्वैत पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले.
अद्वैतचे चुलते सुरेश वर्मा हे दिल्ली येथे वकील आहेत. त्यांनी पुण्यातील स्थानिक वकील नितीन कांबळे यांच्यामार्फत नोटीस दिली आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड कलम 80 अंतर्गत ही नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये नुकसान भरपाई सह धरणात जाणाऱ्या लोकांसाठी जनजागृती करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने धरण परिसरात जनजागृती केली नसल्याचे तसेच ठिकठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे.
Pune Railway : गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी पुण्यातून सुटणार सहा रेल्वे
पवना धरण हे मावळ परिसरातील मुख्य पर्यटनाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे प्रशासनाने धरण परिसरात लाईफ जॅकेट आणि बोट तैनात करणे गरजेचे असल्याचे ऍड नितीन कांबळे म्हणाले.
वर्षभरात चौघांचा मृत्यू
पवना धरणात बुडून मागील वर्षभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात मनीष शंकर शर्मा (वय 20), फेब्रुवारी महिन्यात मयंक अखिलेश उपाध्याय (वय 25), जून महिन्यात अद्वैत वर्मा (वय 18), जुलै महिन्यात सागर कैलास साठे (वय 28) यांचा मृत्यू झाला आहे.