एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड विद्यापीठ व गर्जे मराठी ग्लोबल यांच्यामध्ये न्यू जर्सी, अमेरिका येथे सामंजस्य (Pimpri) करार करण्यात आला. गर्जे मराठी ग्लोबल ही संस्था अमेरीकेसह जगभरामध्ये विखुरलेल्या मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचे काम करते.
गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेतर्फे न्यू जर्सी येथे तीन दिवसीय जागतिक उद्योजक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये एक हजार हून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमात करत आहे. अल्पावधीतच पीसीयुने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. जगातील 33 पेक्षा अधिक विद्यापीठे, संस्था यांच्या बरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत.
गर्जे मराठी ग्लोबल संस्थेच्या मदतीने विद्यापीठामध्ये इनक्युबेशन सेंटरची स्थापना केली असून जगभरातील उद्योजकांच्या मदतीने नवीन स्टार्टअप उद्योग ईकोसिस्टीम उभारण्यासाठी पीसीयुला मार्गदर्शन मिळणार आहे.
या सामंजस्य करारावर गर्जे मराठी ग्लोबलच्या वतीने अध्यक्ष आनंद जानू, संचालक विजय तलेले, ललित शिंदे यांनी तर पिंपरी चिंचवड विद्यापीठातर्फे नियामक मंडळाचे सदस्य सचिन ईटकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात (Pimpri) आला.