एमपीसी न्यूज – भोसरीतील शितल बाग येथील पादचारी पुल 70 लाखावरून सात कोटीचा ( Bhosari) कसा झाला. पालिकेच्या दीडशे शाळांच्या ई लर्निंगच्या 43 कोटीच्या कंत्राटाचे काय झाले. अर्बन स्ट्रीटसाठी 45 कोटी घालून एका नाहक निष्पाप जीवाचा बळी जातो. एकीकडे इंद्रायणी थडी भरवायची, दुसरीकडे नमामि इंद्रायणी म्हणत इंद्रायणी माईच्या नावाखाली पैसे लाटायचे. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तब्बल 1400 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले असतानाही दर दिवशी इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मग, 1400 कोटी रुपये कुठे गेले असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
Pune : विश्रांतवाडी परिसरातून एक कोटीचे अमली पदार्थ जप्त
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात काढण्यात येत असलेली शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी भोसरीत आली होती. यात्रेत बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्रमकपणे भाषण केले. नाशिक फाटा ते चांडोली कॅरीडोरबद्दल बोलताना ते म्हणाले या कामासाठी सुरुवातीपासून मी जो खर्च सांगितला आजही तो आकडा तेवढाच आहे.मात्र भोसरीमध्ये जादू होते. भोसरीतील शितल बाग येथील पादचारी पुल 70 लाखावरून सात कोटीचा कसा झाला. पालिकेच्या दीडशे शाळांच्या ई लर्निंगच्या 43 कोटीच्या कंत्राटाचे काय झाले. अर्बन स्ट्रीटसाठी 45 कोटी घालून एका नाहक निष्पाप जीवाचा बळी जातो. एकीकडे इंद्रायणी थडी भरवायची, दुसरीकडे नमामि इंद्रायणी म्हणत इंद्रायणी माईच्या नावाखाली पैसे लाटायचे. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तब्बल 1400 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत असे असतानाही दर दिवशी इंद्रायणी नदी फेसाळत असेल तर कोणत्या एसटीपी प्लांट मधून पाणी प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते हे देखील पहावे लागेल. माझ्या कामात कुणी लक्ष घालत असेल तर मलाही त्यांच्या कामात लक्ष घालावे लागेल असे म्हणत त्यांनी एक प्रकारे भोसरीतील स्थानिक आमदारांना इशारा दिला.असा कारभार करण्यासाठी मोकळे रान मिळावे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या जात आहेत आणि याबाबत गेली 14 वर्ष पालकमंत्री असलेले चकार शब्द बोलत नाही . पालकमंत्री या कारभाराची चौकशी लावणार का असेही कोल्हे यावेळी म्हणाले.
तुषार कामठे म्हणाले, शहराचे महायुतीच्या कारभाऱ्यांनी दोन तुकडे केले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहराचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे.अजित गव्हाणे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वामुळे पक्षाची ताकद आता आणखी वाढणार आहे.
अजित गव्हाणे म्हणाले की, आशिया खंडात ज्या महापालिकेचा श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक होता. दुर्दैवानं आज या महापालिकेची ओळख सर्वात भ्रष्टाचारी महापालिका म्हणून होत आहे. याला येथील स्थानिक आमदार कारणीभूत आहेत. म्हणूनच आता जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे आणि जनतेने ठरवलं आहे की आता शहरातील तीनही आमदार बदलायचे आहेत. त्यामुळे लोकांनी आता ठरवले आहे की शहरांमध्ये परिवर्तन घडवायचे आहे. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांनी या शहराची एक वेगळी ओळख निर्माण करून ठेवली होती. औद्योगिक नगरी म्हणून या शहराची भरभराट केली. औद्योगिकिकरणाला पोषक वातावरण निर्माण केलं. महाराष्ट्रात शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली. मात्र या शहराला अधोगतीच्या मार्गावर नेण्याचं काम येथील आमदारांनी केले आहे. राजकारणात काम करताना आम्ही आमचा व्यवसाय वेगळा ठेवला. मात्र येथील आमदारांनी राजकारणाचा व्यवसाय केला असल्याची घणाघाती टीका देखील गव्हाणे यांनी केली.म्हणूनच येथे परिवर्तन गरजेचे आहे. शहरातल्या तिनही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या विचाराचे आमदार निवडून आल्यानंतर पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे असेही गव्हाणे म्हणाले.
देर आये मगर दुरुस्त आये!
जयंत पाटील सभेत म्हणाले अजित गव्हाणे तुम्ही यायला उशीर का केला? तुम्ही थोडे लवकर आमच्याकडे आला असता तर शिरूर मतदार संघाचे भोसरीतील घटलेले साडेआठ हजाराचे लीड वीस पंचवीस हजारांनी वाढले असते. पण ठीक आहे देर आये मगर दुरुस्त आये.
वगनाट्याने आणली रंगत!
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित वगनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर वगनाट्यातून भाष्य करत एकच रंगत ( Bhosari) आणली.